Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana April Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप लाडक्या बहि‍णींना मिळालेला नाही. त्यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? याकडे लाडक्या बहि‍णींचे लक्ष लागलेलं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या तथा राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्वाची माहिती सांगितली आहे.

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित केली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. तसेच महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना १५०० ऐवजी दरमहा २१०० रुपये देण्याचंही आश्वासन दिलं होतं. मात्र, अद्याप लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याच्या निर्णयावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

दरम्यान, एप्रिल संपला तरीही अद्याप एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहि‍णींना मिळाला नव्हता. त्यामुळे लाडक्या बहिणींकडून याबाबत प्रश्न विचारले जात होते. असं असतानाच आता महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? याची माहिती त्यांनी सांगितली आहे. ‘लाभार्थी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांमध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता आजपासून (२ मे) जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे’, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.

आदिती तटकरे यांनी काय म्हटलं?

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून (२ मे) सुरू करण्यात येत आहे. पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत दिली आहे.