कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मजमोजणी जवळपास पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाने आतापर्यंत (७ वाजेपर्यंत) २१४ जागांवरील निकाल घोषित केला आहे. यामध्ये काँग्रेसने बहुमत मिळवलं असून त्यांना भारतीय जनता पार्टीपेक्षा जवळपास दुप्पट जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने १३१ जागांवर विजय मिळवला असून अन्य पाच जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर भाजपाने ६० जागा जिंकल्या असून ५ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. जेडीएस पक्षाने १६ जागा जिंकल्या असून हा पक्ष ३ जागांवर आघाडीवर आहे. या निकालावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पक्षांचे नेते देखील यावर प्रतिक्रिया देत आहेत.
भाजपाने त्यांचा पराभव मान्य केला असून राज्यातल्या भाजप नेत्यांनी यावर फारसं बोलणं टाळलं. तर महाविकास आघाडीतले तिन्ही पक्षांचे (शिवसेना-ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस) नेते भाजपाला टोले लागावत आहेत. दिल्ली दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी दिल्लीतूनच भाजपावर हल्लाबोल केला.
हे ही वाचा >> “दुसऱ्याच्या घरात मूल झाल्यावर…”, देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
आदित्य ठाकरे म्हणाले, कर्नाटकच्या निवडणुकीचा निकाल म्हणजे वेगळ्या राजकारणाची सुरुवात आहे. देशात आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. ४० टक्क्यांचं सरकार गेलं आहे. परंतु भ्रष्ट सरकार, गद्दारांचं सरकार महाराष्ट्रात बसलं आहे, तेही आम्ही घालवू याची मला आता खात्री पटली आहे. कर्नाटकातलं भ्रष्ट सरकार, अनैतिक सरकार लोकांनी बहुमताने घालवलं आहे. अनैतिक, असंविधानिक, बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारांना मदत करणारं सरकार महाराष्ट्रातील जनता पळवून लावेल याची खात्री पटली आहे. ४० टक्क्यांचं सरकार गेलं आहे, आता खोके सरकारही जाणार.