आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर असणारे शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेत टोला लगावला आहे. ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्पाचा संदर्भ देत आदित्य यांनी शिंदेंच्या दौऱ्यांवरुन खोचक शब्दांमध्ये रत्नागिरीमधील सभेत टीका केली. या प्रकल्पासंदर्भातील पाठपुरावा उद्योग खात्याने आणि मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर केला पाहिजे असं आदित्य ठाकरे म्हणाले. मात्र ही घाई करण्यामागे त्यांनी मुख्यमंत्र्यांना आता नवरात्रीमध्ये दांडीया आणि गरब्यासाठी जायचं असेल तर काम मागे राहून जाईल असा उपहासात्मक संदर्भ दिला. तसेच मुख्यमंत्री शिंदे नवरात्रीमध्ये मंडळ फिरण्याचा विक्रम करतील असा शाब्दिक चिमटाही आदित्य ठाकरेंनी काढला.
नक्की पाहा >> “मी आजही फोन उचलून थेट उद्धव ठाकरेंशी…”; राज ठाकरेंबद्दल प्रश्न विचारला असता फडणवीसांचं विधान, शरद पवारांचाही केला उल्लेख
राज्यातून बाहेर गेलेल्या उद्योगांबद्दल बोलताना आदित्य यांनी, “उद्योग खातं असेल किंवा मुख्यमंत्री असतील लवकर पाठपुरावा केला पाहिजे. कारण आता नवरात्री येणार आहे तर मुख्यमंत्री मोहोदयांना दांडिया, गरबा (फिरायचं असेल). सध्या त्यांचं रेकॉर्ड आहे. २५० मंडळं तरी फिरलेले असतील. आता ४५० मंडळं (फिरतील) स्वत:च्या नावाने वर्ल्डबूकमध्ये रेकॉर्ड करायचं आहे. गरागरा.. गरागरा फिरायचं आहे सगळीकडे,” असा टोला अगदी हातवारे करुन लगावला. पुढे बोलताना आदित्य यांनी, “थोडं हे बाजूला ठेवलं पाहिजे,” असंही म्हटलं.
मुख्यमंत्री शिंदेंच्या आगामी ‘हिंदू गर्व गर्जना’ यात्रेवरही आदित्य ठाकरेंनी टीका केली. “काल परवा मी ऐकलं की मी यात्रा काढली शिवसंवाद म्हणून त्यांना पण आता यात्रा करायची आहे कुठली तरी गर्जना यात्रा. ठीक आहे यात्रा करा. यात्रांना माझा आक्षेप नाही. पण यात्रा काढण्याआधी तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उत्तर देणं गरजेचं आहे की तुम्ही अजून ओला दुष्काळ जाहीर का नाही केला?” असं आदित्य म्हणाले. त्याचप्रमाणे, “ज्या ज्या सवलती आम्ही महाविकास आघाडीकडून देत होतो, कर्जमुक्त करत होतो शेतकऱ्यांना ते तुम्ही अजून का नाही केलं, याचंही उत्तर शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे,” असं आदित्य म्हणाले.
“ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जात आहात तिथल्या तरुणांना तुम्ही उत्तर देणं अपेक्षित आहे की जो रोजगार आपण या महाराष्ट्रात आणणार होतो तो रोजगार तुम्ही का नाही आणू शकलात, हे उत्तर देणं गरजेचं आहे. डबल इंजिनमध्ये एक इंजिन फेल का झालं आहे? हे उत्तर देणं गरजेचं आहे,” असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
नक्की वाचा >> “ज्यांचं अवघं आयुष्य बारामती…”; पंतप्रधान मोदींवरील टीकेवरुन भाजपाचं शरद पवारांना प्रत्युत्तर! म्हणाले, “…असली भाषा शोभत नाही”
कोकणातील शिंदे सरकारमधील महत्त्वाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावरही आदित्य यांनी टीका केली. “आज महाराष्ट्रातील हालत कशी आहे बघा. उद्योगमंत्र्यांना माहिती नाहीय की महाराष्ट्रात काय चाललं आहे. महाराष्ट्रात किती उद्योग आहेत. किती उद्योग मागच्या सरकारने आणलेत आणि किती या सरकारमुळे पळून गेलेत हे या उद्योगमंत्र्यांना माहिती नाही,” असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.