सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०१४च्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून, मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यासंदर्भात सर्व मतमोजणी कर्मचा-यांचे १४ मे रोजी दुस-यांदा प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी सुमारे १५०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने विकसित केलेल्या जनरल लोकसभा इलेक्शन २०१४ या सॉफ्टवेअरच्या आधारे प्रत्येक फेरीच्या मतमोजणीची नोंद केली जाणार आहे. हा निकाल एकत्रीकरण करणे व वेबसाईटवर टाकण्यासाठी ७६ जणांचा गट केला आहे. उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाइल तसेच इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट आत आणण्याची परवानगी नाही.
शासकीय कृषी महाविद्यालयासमोर बांधलेल्या शासकीय तंत्रनिकेतनच्या नवीन इमारतीत मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. तेथेच १६ मे रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे काम पूर्ण झाले असून त्यांना मतदान यंत्रे हाताळण्याबरोबरच मतमोजणीच्या पद्धतीची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदासंघांसाठीची मतमोजणी स्वतंत्र हॉलमध्ये होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी १४ टेबल असतील. त्यावरून जास्तीतजास्त २६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. प्रत्येक टेबलसाठी उमेदवारांना एक प्रतिनिधी नेमण्याची परवानगी आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांनी जवळपास १२२९ प्रतिनिधी नेमले आहेत. पोस्टल मतमोजणीसाठी कोल्हापूरसाठी ७ व हातकणंगलेसाठी ७ टेबल आहेत. तसेच, मतमोजणी प्रक्रिया गतीने होण्यासाठी मतमोजणी कक्षामध्ये ७८ संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
मतमोजणी केंद्रावर व सुरक्षा कक्ष यांच्यावर सतत नजर ठेवण्यासाठी ६४ सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. त्याशिवाय प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणीचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्याची सोय करण्यात आली आहे. नागरिकांसाठी प्रत्येक फेरीनिहाय निकाल ऐकण्यासाठी सायबर चौक, त्रिशक्ती चौक, शिवाजी विद्यापीठ चौक आदी ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. इमारतीच्या बाहेर सुरक्षेच्या दृष्टीने योग्य तो बंदोबस्त राहणार असून बाहेर मंडपही उभारण्यात आला आहे. स्वतंत्र वार्ताहर कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे.
मतमोजणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी यापूर्वीच आढावा बठक घेऊन मतमोजणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत, तसेच जिल्हाधिकारी माने व उपजिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चौगुले, उपजिल्हाधिकारी स्वाती देशमुख यांनी प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी भेट देऊन मतमोजणी केंद्राची पाहणी केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th May 2014 रोजी प्रकाशित
कोल्हापुरात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०१४च्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून, मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यासंदर्भात सर्व मतमोजणी कर्मचा-यांचे १४ मे रोजी दुस-यांदा प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

First published on: 15-05-2014 at 04:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Administration ready for counting of votes in kolhapur