|| जगदीश तांडेल
उरण विधानसभा मतदारसंघात प्रथमच पायंडा :- उरण विधानसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी रंगात आली असून उरण परिसरात उरण पनवेल महामार्गा लगत असलेल्या मोठ मोठय़ा जाहिरात फलकांद्वारे उमेदवार प्रचार करीत आहेत. उरण विधानसभा मतदारसंघात प्रथमच अशा प्रकारच्या जाहिरात फलकांचा वापर उमेदवारांकडून केला जात आहे. मात्र या फलका संदर्भात नागरिकांना शंका असून हे फलक अधिकृत आहेत की अनधिकृत, असा प्रश्न विचारला जात आहे.
उरण परिसरातील महामार्गाच्या लगत भव्य असे जाहिरात फलक लावण्यात आलेले आहेत. पुण्यातील फलकाच्या अपघातानंतर अशा फलकांचा धोका समोर आलेला होता. असे असताना याच फलकांचा वापर करीत सध्या उमेदवारांकडून प्रचार केला जात आहे. या मोठमोठय़ा फलकांद्वारे चिन्ह व उमेदवार यांचा प्रचार केला जात आहे. उरण परिसरातील बोकडविरा चारफाटा येथील एक फलक दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात पडल्याची घटना घडली होती. हा फलक मार्गातच आडवा झाला होता. त्यामुळे या फलकांविषयी शंका व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात उरण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ज्या उमेदवारांनी अशा प्रकारच्या फलकांवर जाहिराती केल्या आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ना हरकती जोडल्या आहेत. त्यामुळे त्यांना अशा प्रकारचे फलक लावण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.