Advocate Nitin Satpute Powai Hostage case : मुंबईतील पवई येथे रोहित आर्य नामक इसमाने १७ अल्पवयीन मुलांना डांबून ठेवल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी १७ मुलांची सुखरूप सुटका केली. या कारवाईदरम्यान रोहित आर्य याचा मृत्यू झाला. पोलिसांवर हल्ला केल्याने त्याच्यावर गोळीबार करण्यात आला आणि छातीत गोळी लागल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू असताना रोहित आर्यचा मृत्यू झाला. दरम्यान रोहित आर्य याच्या मृत्यूबाबत ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. इतकेच नाही तर या प्रकरणाच्या चौकशीसाठी आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचेही सातपुते म्हणाले आहेत.
एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सातपुते म्हणाले की, मुलांची सुरक्षितता ही नक्कीच झाली पाहिजे. रोहित आर्य याने केलेले कृत्य चुकीचे कृत्य आहे. मुलांना ओलीस धरायला नको होते. पण जेव्हा कधी असा प्रसंग उद्भवतो तेव्हा काय केलं पाहिजे याचं पोलिसांना प्रशिक्षण दिले जाते. त्याला फक्त गोळीच मारता आली असती का? की इतर कोणते उपाय करता आले नसते का? दोन तास तो डीसीपी नलावडे यांच्याशी दोन तास तो संपर्कात होता, चर्चा करत होता. मग तुम्ही चर्चेत काय केलं? त्याच्या कुटुंबाशी संपर्क का नाही साधला? तो केसरकरांच्या संपर्कात होता, मग त्यांना संपर्क का नाही साधला? असे प्रश्न अॅड. नितीन सातपुते यांनी उपस्थित केले आहेत.
त्याने (रोहित आर्य) हे जे पाऊल उचललं, मुलांचं त्याने जे अपहरण केलं ते त्याने का केलं? तुम्ही त्याचे पैसे का नाहीत दिले? सरकारने ही परिस्थिती निर्माण केली. डीसीपी नलावडे जेव्हा दोन तास त्यांच्याशी संपर्कात होते तेव्हा त्यांना हे सेटल करता आलं असतं, की तुझे पैसे आम्ही देतो तू असा काही वाईट प्रकार करू नको असं सांगून हा प्रसंग टाळता आला असता. तसं त्या डिसीपींनी केलं नाही, सरकारने केलं नाही, गृह खात्याने केलं नाही, केसरकरांनीही केलं नाही, असे वकिल नितीन सातपुते पुढे बोलताना म्हणाले.
मागचा एक महिना उपोषण करत होते
मागचा एक महिना तो आणि त्याची पत्नी उपोषण करत होते. एकदा तो बेशुद्ध पडला तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सरकारकडून त्याचे पैसे मिळावे म्हणून त्याने अनेक प्रयत्न केले, पण सरकारने त्याचे पैसे दिले नाहीत. पैसे मिळाले नाही म्हणून त्यानंतर त्याने एकदा आत्महत्याचा विचार केला. जसं मुलांचे अपहरण करणे हे जेवढं चुकीचं आहे तेवढंच आत्महत्या करणं देखील चुकीचं आहे.
त्याला असं वाटलं असेल की, आत्महत्या करून माझ्या कुटुंबाला पैसे कोण देणार, मग त्याने शक्कल लढवली, त्याने थर्सडे नावाचा चित्रपट पाहिला, आणि कंदाहरचं प्रकरण माहितीच आहे. त्यावेळी देखील भारतीय विमान हायजॅक झालं होतं, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार पुढे आलं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करून त्यांना सोडून देण्यात आलं. मग हा तर भारतीय होता ना? हा तुमचाच माणूस होता ना? सरकारची कामं करत होता ना. मग एवढा सज्जन माणूस मुलांना इजा करेल का? याचा विचार तुम्ही करायला हवा होता, असेही सातपुते म्हणाले.
मुलांना सोडवलं ही कौतुकाची बाब आहे. पण त्याबरोबर नागरिकांची काळजी घेणं देखील गरजेचं आहे. मुलांना सोडवण्यासाठी समोरच्याची हत्या करणं हे चुकीचे आहे. तो काही गुन्हेगार नव्हता. त्यावर कोणतेही गुन्हे नव्हते असेही सातपुते म्हणाले. तुम्ही पहिल्यांदा त्याच्या पायात गोळी का नाही मारली? असा प्रश्न उपस्थित करत आपण या प्रकरणी न्यायालयात जाणार असून याची चौकशी झाली पाहिजे असेही सातपुते यावेळी म्हणाले.
तो काही गँगस्टर किंवा दहशतवादी नव्हता की तुम्ही त्याच्या छातीत गोळी मारावी, पोलिसांनी किती प्रयत्न केले. त्याच्याकडे गन असेल तर त्याने किती छर्रे मारले? भितींवर गोळ्या उडाल्या आहेत का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
कोर्टात काय याचिका करणार?
पोलिसांनी कोणतीही कोणतीही प्रिमिटीव्ह मेजर घेतले नाहीत. दोन तास तो डीसीपींशी बोलत होता, तेव्हा हे प्रकरण शांत करता आलं असतं. त्याला समजवता आलं असतं किंवा इतर उपाय करून त्याचा जीव वाचवता आला असता आणि मुलांनाही वाचवता आलं असतं. हे पोलिसांचं कौशल्य आहे. पण पोलिसांनी यामध्ये कोणतंही कौशल्य वापरलं नाही, असेही सातपुते म्हणाले.
“अमोल वाघमारे नावाच्या एपीआयला हिरो व्हायचंय, त्यांना प्रदिप शर्मा, दया नायक, प्रफुल भोसले व्हायचंय…. जे-जे सगळे जुने एन्काउंटर वाले होते तसं करून त्यांना नाव कमवायचं आहे. त्यामुळे त्यांने हत्या करून हिरोगिरी केली आहे. त्यामुळे प्राथमिकतेने तिघांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे,” असे सातपुते म्हणाले.
सरकारकडने त्याचे पैसे येणं असेल आणि ज्यामुळे त्याची आज हत्या झाली… तर त्याचे पैसे न दिल्याने मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांवर दोन कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना अटक केली पाहिजे असेही अॅड. नितीन सातपुते म्हणाले.
