चौदा दिवसांच्या विश्रांतीनंतर मोसमी पाऊस पुन्हा रुळावर!

गेल्या चोवीस तासांमध्ये माथेरान येथे राज्यातील सर्वाधिक २६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पुणे : राज्यात दाखल होऊन मागील चौदा दिवसांपासून जागेवरच रखडलेला नैर्ऋत्य मोसमी पाऊस शनिवारी (२३ जून) पुन्हा रुळावर आला असून, त्याने पुढील वाटचाल सुरू केली आहे. सध्या  संपूर्ण कोकण किनारपट्टी व्यापून तो गुजरातच्या वलसाड, मध्य महाराष्ट्रातील मालेगाव, तर विदर्भातील अमरावतीपर्यंत पोहोचला आहे. मोसमी पावसाच्या सक्रियतेमुळे कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी (२४) राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता असून, कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात तो जोरदार बरसेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, घडले उलटेच. वाऱ्यांचे प्रवाह मंदावल्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्याची प्रगती रखडली होती. त्याचप्रमाणे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ९ जूनपासून तो स्थिर होता. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत होती. मागील दोन ते तीन दिवसांपासून मोसमी पावसासाठी अरबी समुद्र आणि हिंदू महासागरातील वातावरणामुळे अनुकूल स्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. पोषक स्थिती निर्माण होत असल्याने मंगळवापर्यंत (२६ जून) मोसमी पाऊस उत्तर अरबी समुद्र, उर्वरित महाराष्ट्र, आसाम ,गुजरात, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, मध्य प्रदेशाच्या आणखी काही भागात प्रगती करण्याची शक्यता आहे.

माथेरानमध्ये सर्वाधिक  पाऊस

गेल्या चोवीस तासांमध्ये माथेरान येथे राज्यातील सर्वाधिक २६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. राज्यात इतर भागातही पावसाने हजेरी लावली. प्रमुख ठिकाणच्या पावसाची नोंद (मि.मी.) पुढीलप्रमाणे- कर्जत २४०, रत्नागिरी २१०, लांजा १४०, हर्णे १३०, रोहा ११०, राजापूर १००, डहाणू, खालापूर प्रत्येकी ९०, मुरबाड, पालघर, ठाणे, वसई प्रत्येकी ७०, मराठवाडय़ातील उमरगा १५०, औंढा नागनाथ १००, चाकूर, निलंगा प्रत्येकी ८०मि. मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: After 14 days of rest heavy rain across maharastra