राजापूर : तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प विरोधातील उग्र आंदोलनामुळे गेले चार दिवस तापलेल्या बारसू सडय़ावर शनिवारी शांतता पसरली. येथील आंदोलन तीन दिवस स्थगित करण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांनी शुक्रवारी संध्याकाळी जाहीर केला. त्यामुळे सर्वेक्षण स्थळाकडे आंदोलक फिरकले नाहीत. म्हणून त्यांच्या उपस्थितीने गजबलेला बारसूचा सडा आज काहीसा सुनासुना होता. मात्र, सावधगिरीचा उपाय म्हणून ठिकठिकाणी पोलीस फौजफाटा तैनात केलेला आहे.
प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या दृष्टीने माती परीक्षणासाठी ड्रिलिंगचे काम गेल्या मंगळवारपासून सुरू झाले आहे. या कामाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून या परिसरातील ग्रामस्थ गेले पाच दिवस सडय़ावर ठिय्या मांडून बसलेले होते. यापूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वेक्षणाच्या कामाला झालेला विरोध लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सतर्क होऊन सुमारे दोन हजार पोलिसांचा फौजफाटा या परिसरात तैनात केला आहे . माती परीक्षणाच्या कामासाठी मंगळवारी पोलीस बंदोबस्तात आलेल्या तंत्रज्ञांच्या गाडय़ा आंदोलक महिलांनी रस्त्यावर लोळण घेत रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी काही आंदोलक महिलांना ताब्यात घेतले. त्यानंतर ड्रिलिंग आणि ग्रामस्थांचे आंदोलनही शांततेत चालू होते.
जिल्हा प्रशासनाने रिफायनरीच्या अनुषंगाने ग्रामस्थांची विशेष बैठक घेऊन गुरुवारी राजापुरात तज्ज्ञांसमवेत शंकानिरसनाचा कार्यक्रमही केला. पण शुक्रवारी दुपारी आंदोलकांनी एकत्र येऊन ड्रिलिंगचे काम चालू असलेल्या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांशी झटापट होऊन हिंसक वळण लागले आणि या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सायंकाळी रिफायनरी विरोधी ग्रामस्थांच्या स्थानिक नेत्यांनी तीन दिवसांसाठी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केल्यानंतर वातावरण निवळले. बारसू परिसरातील सडय़ावर शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सुमारे ७५ ते ८० महिला आंदोलकांना नोटीस देऊन तत्काळ मुक्त करण्यात आले. मात्र, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सुमारे ३६ आंदोलकांना शनिवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता वैयक्तिक जामिनावर सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामस्थांसमवेत आज बैठक
दरम्यान धोपेश्वर आणि बारसू येथील शेतकरी, ग्रामस्थ आणि प्रकल्प विरोधकांशी संवाद साधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उद्या दुपारी चार वाजता बैठक आयोजित केली आहे. राजापूर नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाटय़गृहात ही बैठक होणार असून जिल्हाधिकारी देवेंदर सिंग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुळकर्णी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रांताधिकारी वैशाली माने यांनी दिली.