शिवसेनेत मोठी बंडखोरी होऊन त्यात एकनाथ शिंदे यांना साथ देणारे आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांना सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील दौऱ्यात शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे प्रा. सावंत येऊन गेल्यानंतर तेथील मार्गावर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून मार्गाचे शुध्दिकरण केल्याचा प्रकार घडला.
प्रा. तानाजी सावंत यांच्या माळशिरस भागातील दौऱ्याला स्थानिक शिवसैनिकांनी तीव्र विरोध दर्शविला होता. ऐनवेळी दौऱ्यात शिवसैनिकांकडून गडबड होण्याची चिन्हे दिसू लागताच पोलिसांनी खबरदारी म्हणून संबंधित शिवसैनिकांना नोटिसा बजावल्या होत्या. तसेच अमोल उराडे व रूपेश लाळगे यांना ताब्यात घेऊन स्थानबध्द करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर काहीशा तणावपूर्ण वातावरणात प्रा. सावंत यांचा माळशिरस व नातेपुते येथील दौरा झाला. त्यावेळी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला होता. मात्र प्रा. सावंत हे परत जाताच नातेपुते गावात ते ज्या रस्त्याने आले आणि परत गेले, त्या रस्त्यावर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून शुध्दिकरण केले. नगरसेवक नंदकुमार लांडगे, संदीप लांडगे, नवनाथ राऊत, किसन विटकर आदी शिवसैनिकांनी हे आंदोलन केले.