महागाई भत्त्यात वाढ आणि त्यानंतर एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याच्या मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. संप वा काम बंद करण्यास एसटी कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाने बुधवारी मनाई केली आहे. या प्रकरणी गुरुवारी ११ वाजता सुनावणी होणार होती. मात्र एसटी कामगारांच्या संघटनांनी उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता उद्या पुन्ह सुनावणी होणार आहे.

मात्र दिवाळीच्या तोंडावर दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे आंदोलन आता चिघळले आहे. ज्या कामगार संघटना आहेत त्या संघटनांनी आमचा घात केला असा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे जोपर्यंत पगार वाढ आणि एसटीचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे.

त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या न विनंती केली आहे. फडणवीस यांनी ट्विट करत ही विनंती केली आहे. “सततच्या समस्यांमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या वेदनादायी आहेत. पण माझी एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा कळकळीची विनंती आहे की, आत्महत्येसारखे टोकाचे आणि चुकीचे पाऊल उचलू नका! आपण ही लढाई एकत्रित आणि भक्कमपणे न्यायालयात लढू!,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली असली तरीदेखील राज्यातील २५० पैकी ५९ एसटी आगारांमध्ये काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. तर दुसरीकडे उच्च न्यायालयातील सुनावणीकडे कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे उद्या सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही काम बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई का करु नये अशी विचारणा करत नोटीस बजावली आहे.