अतिशय कठोर नियम आणि निर्बंधांचे पालन करीत ९ मानाच्या पालख्या पंढरीत एकादशी सोहळ्यासाठी दाखल झाल्या होत्या. एकादशी आणि द्वादशीला म्हणजेच गुरुवारी सकाळी सर्व संतांनी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्व पालख्या आपाआपल्या गावी परतल्या. या वर्षी आमच्यासह सर्व संतांच्या पालख्यांना पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभल्याचे मुक्ताई संस्थांचे पालखी सोहळा प्रमुख रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांनी सांगितले. ‘जातो माघारी पंढरिनाथा, तुझे दर्शन झाले आता’ अशी आर्त विनवणी करीत संतांच्या पालख्या गावी परतल्या.
करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी वारीवर अनेक निर्बध होते. प्रमुख ९ पालख्या आणि या पालख्यांबरोबर २० लोकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात दाखल होण्याची परवानगी प्रशानसनाने दिली होती. तसेच या सर्वाना करोना चाचणी, तोंडावर मास्क, योग्य अंतर आदी आरोग्य विषयक सूचनेचे पालन सक्तीचे होते. विठुरायाच्या दर्शनाची ओढ आणि परंपरा अखंडित रहावी या उद्देशाने सर्व पालख्यांसमवेत आलेल्या भाविकांनी नियमांचे पालन केले. एकादशीला स्नान, नगरप्रदक्षिणा केली. आपापल्या मठात भजन-कीर्तन करून विठू चरणी सेवा केली.
द्वादशीला म्हणजेच बुधवारी सर्व पालख्यांनी ठरवून दिलेल्या वेळेप्रमाणे श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीने थर्मल चाचणी, सॅनिटायझरची फवारणी आदी उपाय योजना केल्या होत्या. त्यानंतर ज्या एस. टी. बसने पंढरीला आले होते. ती बस परतीच्या प्रवासाठी जाताना फुलांनी सजवली होती. सर्वात पहिल्यांदा संत मुक्ताईची पालखी निघाली. यंदा पोलीस विभागाने सहकार्य केल्याची भावना सोहळा प्रमुख रवींद्र पाटील यांनी बोलून दाखवली. त्यापाठोपाठ संत ज्ञानेश्वर, संत तुकारम आदी संतांनी पंढरीचा निरोप घेतला. ‘आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा’ असे म्हणत आणि मंदिराच्या दिशेने हात जोडत हरिनामाच्या जयघोषात पालख्या गावी परतल्या.