भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्यावर टीका करतानाच पक्षाच्या घटनेनुसार पक्षसंघटनेतील कोणालाही पदमुक्त करण्याचा त्यांना अधिकार नसल्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुवेंद्र गांधी यांनी सांगितले. पक्षश्रेष्ठींची दिशाभूल करूनच याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला होता, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळेच त्यांच्या आदेशाला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्थगिती दिली, असे त्यांनी सांगितले.
खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र यांच्यासह पक्षाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष मनेष साठे व अनिल गट्टाणी, शहर जिल्हा चिटणीस किशोर बोरा व प्रशांत मुथा या गांधी समर्थक पदाधिका-यांची आगरकर यांनी अलीकडेच या पदांवरून हकालपट्टी केली होती. त्यांच्या जागी भय्या गंधे व जगन्नाथ निंबाळकर (दोघेही शहर जिल्हा उपाध्यक्ष), बाळासाहेब गायकवाड व उदय अनभुले (दोघेही शहर जिल्हा चिटणीस) आणि भाजयुमोच्या शहराध्यक्षपदी प्रवीण ढोणे यांची नियुक्तीही आगरकर यांनी जाहीर केली होती. आगरकर यांच्या या निर्णयाला दानवे यांनी दोन दिवसांपूर्वी स्थगिती दिली. पक्षाचे प्रदेश कार्यालय सहसचिव मुकुंद कुलकर्णी यांनी तसे पत्र पाठवले आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी सुवेंद्र गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषद बोलावली होती.
त्यांनी सांगितले, की आगरकर यांच्या आदेशाला आता स्थगिती देण्यात आली आहे. जुनेच पदाधिकारी या पदांवर कार्यरत राहणार आहेत. पक्षाच्या घटनेनुसार शहर जिल्हाध्यक्षांना कोणाला पदमुक्त करण्याचा अधिकारच नाही. मात्र त्या वेळी पक्षश्रेष्ठींची दिशाभूल करून थेट वर्तमानपत्रातच हा आदेश देण्यात आला होता. ही कारवाई करण्याआधी आम्हाला कोणती नोटीसही देण्यात आली नव्हती. पक्षसंघटनेत केवळ काही बदल करायचे आहेत, असे सांगून परस्पर हा आदेश जारी करण्यात आला होता. याबाबत दानवे यांची औरंगाबाद येथे भेट घेऊन यातील वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येताना त्यांची परंपराही ते घेऊन आले, अशी टीका सुवेंद्र गांधी यांनी या वेळी केली. ते म्हणाले, त्यांनीच पक्षात गटबाजी सुरू केली आहे. सामान्य कार्यकर्ते त्यामुळे दुखावले असून ही गोष्ट पक्षाच्या दृष्टीने घातक आहे. ते टाळण्यासाठीच यापुढे कार्यकर्त्यांवर अन्याय करणा-या कारवाया यापुढे सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मनेष साठे, किशोर बोरा, मनोज मुंदडा आदी या वेळी उपस्थित होते.