निसर्गाच्या अवकृपेमुळे प्रचंड दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या परभणी जिल्ह्यावर प्रशासनाची अन्याय करण्याची भूमिका चालूच आहे. जायकवाडी धरणातून १५ दिवसांपूर्वीच पहिले आवर्तन देण्यात आले. परंतु परभणीपासून जाणाऱ्या कालवा क्रमांक ७० मध्ये थेंबभरही पाणी न मिळाल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. या पाश्र्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जायकवाडी कार्यालयासमोर धरणे धरून कार्यालयास कुलूप ठोकण्यात आले. आंदोलनाच्या दणक्यानंतर २५ नोव्हेंबपर्यंत कालवा क्रमांक ७० मध्ये पूर्ण वहन क्षमतेने पाणी देण्याचे लेखी आश्वासन जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून देण्यात आले.
जिल्ह्यात ३ वर्षांपासून दुष्काळी स्थिती असून सिंचन, पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कमी पावसामुळे शेतकऱ्यावर नापिकीचे संकट आले आहे. गारपीट व अवकाळी पावसाने गतवर्षी रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. या वर्षीही खरिपाची दुबार-तिबार पेरणी करूनही हाती काहीच लागले नाही. या सर्व समस्यांचा सामना करण्यासाठी जायकवाडीतून पाणी सोडणे अत्यावश्यक असताना जिल्ह्यातून जाणारा कालवा क्रमांक ७० मध्ये अत्यंत कमी दाबाने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे हे पाणी शेतात पोहोचलेच नाही. अनेक गावे सिंचनापासून वंचित राहिली.
परभणी शहराचा पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेता कालव्यात जायकवाडीतून पाणी सोडावे, या साठी जिल्हाप्रमुख आणेराव दहा दिवसांपासून पाठपुरावा करीत होते. परंतु जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पवळे यांनी मागणीची दखल घेतली नाही. त्याच्या निषेधार्थ आणेराव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जायकवाडी कार्यालयावर चढाई केली. या वेळी पवळे कार्यालयात नसल्याने गोंधळ वाढला. शिवसनिकांनी कार्यालयासमोर ठिय्या देत घोषणाबाजी केली. यानंतर कार्यालयात आलेल्या पवळे यांनी २५ नोव्हेंबपर्यंत कालवा क्रमांक ७० मध्ये पाणी सोडण्याबाबत लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
तालुकाप्रमुख नंदू अवचार, काशिनाथ काळबांडे, अतुल सरोदे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, सदाशिव देशमुख, संदीप झाडे, अनिल डहाळे, नवनीत पाचपोर, गजानन देशमुख आदींसह शेतकरी मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
संग्रहित लेख, दिनांक 13th Nov 2014 रोजी प्रकाशित
जायकवाडी पाण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन
निसर्गाच्या अवकृपेमुळे प्रचंड दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या परभणी जिल्ह्यावर प्रशासनाची अन्याय करण्याची भूमिका चालूच आहे. जायकवाडी धरणातून १५ दिवसांपूर्वीच पहिले आवर्तन देण्यात आले. परंतु परभणीपासून जाणाऱ्या कालवा क्रमांक ७० मध्ये थेंबभरही पाणी न मिळाल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले.
First published on: 13-11-2014 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation of shivsena for jayakwadi water