Manikrao Kokate Loan Waiver of Farmers: महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत येऊन आता जवळपास चार महिने झाले आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप देखील सरकार करत नसल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीमधील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, आता सरकार सत्तेत येताच सर्व घोषणा हवेतच विरल्या का? असा प्रश्न विरोधक विचारत आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल, अशी आशा लागलेली असतानाच काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी संदर्भात मोठं भाष्य करत शेतकऱ्यांनी आपआपले कर्ज भरण्याचे त्यांनी सांगितले. यावरून अजित पवार यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनीही कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावलं आहे. ‘कर्ज घेता आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता, कर्जमाफीच्या पैशांनी काय करता?’, असा अजब सवाल करत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलं आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं की कर्जमाफी होऊ शकत नाही? मग शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल की नाही? असा सवाल एका शेतकऱ्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्या शेतकऱ्यालाच सुनावल्याचं पाहायला मिळालं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं की, “मग जे नियमित कर्ज भरतात त्यांनी का बरं कर्ज भरावं? कर्ज घ्यायचं आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहायची. तोपर्यंत कर्जभरायच नाही”, असं म्हणत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलं.

“मला एक सांगा, आता येथे मीडिया आहे. मीडियासमोर असं बोलत नाही. पण तुम्ही मला सांगा. तुमची (शेतकऱ्यांची) कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये एक रुपयांची तरी गुंतवणूक करता का? सरकार तुम्हाला आता शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे देणार आहे. सरकार तुम्हाला पाईपलाईनाला पैसे, सिंचनासाठी पैसे, शेततळ्यासाठी पैसे देणार आहे. सरकार भांडवली गुंतवणूक करतं. मग शेतकरी भांडवली गुंतवणूक करतात का? शेतकरी म्हणतात, पीक विम्याचे पैसे पाहिजे, मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा”, असं म्हणत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवारही कर्जमाफीबद्दल काय म्हणाले होते?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २८ मार्च रोजी एका कार्यक्रमात बोलताना कर्जमाफीबद्दल भाष्य केलं होतं. अजित पवार म्हणाले होते की, “मी सभागृहात उत्तर देताना देखील सांगितलं होतं की सगळी सोंगं करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. मी महाराष्ट्रातील जनतेला स्पष्ट सांगतो, ३१ मार्चच्या आत आपआपले पीक कर्जाचे पैसे भरा”, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २८ मार्च २०२५ रोजी एका कार्यक्रमात केलं होतं.