अहिल्यानगर : जिल्ह्यात बेकायदा २१ सावकारांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी १९ गुन्ह्यांतील अपिलांमध्ये आतापर्यंत २५ हेक्टर १५.५ आर जमिनीचे क्षेत्र व २२०० चौरस फूट बांधकाम संबंधित शेतकऱ्यांना परत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी सादर केली. सावकारीसंदर्भात तक्रारी त्वरित निकाली काढाव्यात, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केली आहे.
महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम २०१४ अन्वये बेकायदा सावकारी व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी, महाराष्ट्र सावकारी अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या सभेत सहकार निबंधकांनी बेकायदा सावकारी विरोधात २० गुन्हे दाखल केल्याची माहिती दिली. तसेच या सभेत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी विविध सूचना केल्या.
बेकायदा सावकारीविरोधातील प्राप्त तक्रारी निकाली काढताना सर्व संबंधितांना नोटीस पोहोच झाल्याची खात्री करूनच प्रकरणे गुणवत्तेवर निकाली काढण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
बेकायदा सावकारी विरोधात तक्रारी करणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवावे, गरजू व्यावसायिक नागरिक व शेतकरी यांनी आवश्यक असणाऱ्या कर्जाची रक्कम अवैध सावकारांकडून घेऊ नये. सहकार खात्याकडून परवाना दिलेल्या परवानाधारक सावकाराकडूनच कर्ज घ्यावे. जेणेकरून अवैध सावकारीला पायबंध बसण्यास मदत होईल. तसेच जे कोणी अवैध सावकारीमधून कर्जदारांना जादाचे व्याज करून त्रास देत असेल अशा व्यक्तींविरोधात सहकार विभागाकडे तक्रार करावी. संबंधिताचे नाव गोपनीय ठेवण्यात यावे, असे जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले.
परवानाधारक सावकारास शेतकऱ्यांकडून तारणी कर्जास ९ टक्के, विनाकारणी कर्जास १२ टक्के तसेच बिगरशेतकरी व्यक्तींकडून तारणी कर्ज १५ टक्के व विनाकारणी कर्जासाठी व्याजदर शासनाने ठरवून दिल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सुरवसे यांनी दिली. परवानाधारक सावकारांनी राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार व्यवसायाच्या ठिकाणी दर्शनी भागात व्याजाचे दरफलक लावावेत, व्याजदराचे पालन न केल्यास त्याबाबतची तक्रार कोठे करायची त्या कार्यालयाचे नाव, पत्ता याचाही फलकावर स्पष्ट उल्लेख करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
