अहिल्यानगर: जिल्हा कृषी विभागाने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर ‘चॅटबोट’चा वापर करत, संवाद साधत सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादन ते विपणन यादरम्यानच्या विविध टप्प्यांवर माहिती दिली जात आहे. ‘कृषी सखा’ असे त्याचे नाव आहे. शेतकरी ‘क्यूआर कोड स्कॅन’ करून हा संवाद साधत आहे. याशिवाय शेतकऱ्यांना कृषीविषयक अडचणींमध्ये कृषी सल्ला देण्यासाठी ‘कृषी डॉक्टर’ ही पुस्तिका (प्रिस्क्रिप्शन बुक) स्वरूपात तयार करून तिच्या वापरास सुरुवात केली आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या पुढाकारातून हे नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यापूर्वी बोराळे यांनी जिल्हा कृषी विभागाचे ‘व्हाट्सॲप चॅनल’ सुरू केले, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातून ५१ हजार सदस्य त्याचा फायदा घेत आहेत.

‘कृषी सखा’ व ‘कृषी डॉक्टर’ या दोन्ही उपक्रमांचे प्रकाशन काल, शुक्रवारी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात आले. कृषी सखा हे चॅटबोट (एआय असिस्टंट) तयार करण्यासाठी मंजूर (ता. कोपरगाव) येथील तरुण महेश बारवकर याने साहाय्य केले.

अलीकडच्या काळात कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञान वापराचे आवाहन केले जात आहे. काळाची ही गरज ओळखून जिल्हा कृषी अधीक्षक बोराळे यांनी हे पाऊल टाकले. या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांना वैयक्तिक सल्ला देण्यापासून ते प्रत्यक्ष शेतीमधील मार्गदर्शन व शेतीमाल विक्रीसाठी होत आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने शंका निरसन केले जाते. शेतकऱ्यांकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा उपयोग कृषी विभागाला धोरणात्मक निर्णय घेण्यासाठीही होणार असल्याचे सुधाकर बोराळे यांनी सांगितले.

कृषी विभागाने ‘कृषी डॉक्टर’ ही पुस्तिका तयार करून जिल्ह्यातील कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडलाधिकारी अशा सुमारे एक हजारांवर अधिकारी-कर्मचाऱ्यांना वितरित केल्या आहेत. त्याचे स्वरूप डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनसारखे आहे. शेतकऱ्यांना वैयक्तिक सल्ला देण्यासाठी त्याचा उपयोग होतो. कृषीविषयक अडचणींसाठी शेतकरी प्रामुख्याने कृषी सेवा केंद्राकडे धाव घेतात. केंद्रांकडून शेतकऱ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळेल, याची हमी नसते शिवाय केंद्र चालकाला फायदेशीर ठरेल अशा बियाणे, खत, कीटकनाशक वापराची माहिती दिली जाण्याची शक्यता असते व त्यातून गैरमार्गाला चालना मिळते. या पुस्तिकेद्वारे आता कृषी अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना थेट सल्ला मिळेल. त्यावर वरिष्ठांचे नियंत्रण राहील व त्याचा उपयोग कृषीविषयक धोरणांसाठी सुद्धा होईल. परिणामी शेतीमालाच्या उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे.

खोडकिडीसाठी सल्ला

आमच्या गावातील कृषी सहायक एम. जी. रवले यांच्याकडे मी ऊस पिकावरील खोडकिडीसंदर्भात माहिती मागवली होती. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार खोडकिडग्रस्त ऊस उपटून नष्ट केला, उसात पालाशयुक्त खत वापर वाढवला तसेच उसात आंतरपीक कोणते घ्यावे व कोणते टाळावे हेही कळाले. क्विनॉलकॉस हे कीटकनाशक हेक्टरी २०० मिली फवारले. त्याचा उपयोग झाला. – कृष्णा गवळी, सलाबतपूर

कृषी सहायकाची मदत

माझ्या शेतातील काकडी पिकावरील पाने खाणारी अळी, तुडतुडे व माव्यासाठी कृषी सहायक श्रीमती सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली. त्यानुसार डायमेथाईट १.५ मिली. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करण्यास त्यांनी सांगितले. त्यानुसार फवारणी केल्याने कीड आटोक्यात आली. – कल्याण मते, गोगलगाव, नेवासा