अहिल्यानगर: घुलेवाडी (ता. संगमनेर) येथे हभप संग्रामबापू भंडारे महाराज यांच्यावर काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप करत भाजपने भंडारे महाराजांना पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन देऊन केली आहे. तसेच हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना पकडून कडक कायदेशीर शिक्षा करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.

भाजपचे तिन्ही जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते (नगर शहर), दिलीप भालसिंग (दक्षिण जिल्हा) व नितीन दिनकर (उत्तर जिल्हा) यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, घुलेवाडी गावातील काँग्रेस समर्थकांनी भंडारे महाराजांच्या कीर्तनात गोंधळ निर्माण करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वाहनांचेही नुकसान केले. थोरात समर्थकांनी हिंदुत्वाच्या विचारांवर केलेला हा हल्ला आहे. त्यामागे कट व षडयंत्र आहे. त्यामुळे हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना पकडून कडक कायदेशीर करावी. भंडारी महाराजांच्या जीवितास धोका असल्याने त्यांना पोलीस संरक्षण द्यावे.

भंडारे महाराजांवर हल्ला करण्यामागे बोलविता धनी कोण आहे, याचा शोध घ्यावा. माजी मंत्री थोरात यांचे कार्यालयीन कर्मचारी, पदाधिकाऱ्यांना चिथावणी देणाऱ्यांचा पर्दाफाश करणे आवश्यक आहे. घुलेवाडी येथील घटनेची गंभीर दखल घ्यावी व आरोपींना अटक करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे एका कीर्तन कार्यक्रमादरम्यान हभप भंडारे महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ व काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. स्थानिक पातळीवरील या वादात आता जिल्हा भाजपनेही उडी घेतली आहे. त्यातूनच भाजपच्या तीन जिल्हाध्यक्षांनी एकत्र येत, जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत हल्लेखोरांवर कारवाईची मागणी करताना थोरात यांना लक्ष केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमधील राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातूनच आजी-माजी आमदारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. थोरात यांच्या विरोधात आमदार खताळ यांना पाठबळ देण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील दौऱ्यांमध्ये वाढ केली आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही संगमनेरमध्ये येऊन थोरात यांना समर्थन दिले होते. या घडामोडीतून स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्याचे मानले जाते.