अहिल्यानगर: मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र असलेल्या व ‘देवाभाऊ’ असा उल्लेख केलेल्या निनावी जाहिराती प्रसिद्धी माध्यमात सर्वत्र झळकल्या होत्या. विरोधकांनी हा प्रचंड खर्च कोणी केला, असा प्रश्न उपस्थित करत टिकेची झोड उठवली होती. मात्र, आता याच जाहिराती नगर शहराच्या विविध भागांतील भिंतीवरही झळकू लागल्या आहेत. विशेष म्हणजे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते या जाहिराती कोण रंगवते आहे, याबद्दल अनभिज्ञ आहेत.
नगर शहरातील विशेषतः उपनगरांतील घराघरांच्या कुंपणाच्या भिंतीवर या जाहिराती रंगवल्या जात आहेत. गेल्या दोन, चार दिवसांपासूनच या जाहिराती रंगवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या जाहिरातींवर केवळ ‘देवाभाऊ’ असा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांना फुले अर्पण करत आहेत, अशी जाहिरात रंगवली जाऊ लागली आहे.
या जाहिरातींवर प्रकाशक, चित्रकार असा कोणाचाही उल्लेख नाही. त्यामुळे या जाहिराती कोण रंगवते आहे व त्याचा खर्च कोण करते आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरात सध्या महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर आला आहे. नागरी प्रश्नांकडे लक्ष वेधत महापालिकेच्या विरोधात आंदोलनेही सुरू झालेली आहेत.
असे वातावरण असतानाच या जाहिराती शहरातील भिंतींवर रंगवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील वसाहतींना, बंगल्यांना असलेल्या कुंपणाच्या भिंती, दुकानांच्या भिंती यावर या जाहिराती रंगवल्या जात आहेत. त्याची संख्याही अधिक प्रमाणात आहे. या जाहिराती पाहून नागरिकांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे. जाहिराती कोणाकडून रंगवल्या जात आहेत, त्याचा खर्च कोण करत आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
भाजप शहर जिल्हाध्यक्षांकडून प्रतिसाद नाही
‘देवाभाऊ’ नावाचा उल्लेख करून मुख्यमंत्री फडणवीस यांचे छायाचित्र असलेल्या जाहिराती शहरातील भिंतींवर रंगवले जात असल्या संदर्भात भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्याशी प्रथम संपर्क साधला असता, त्यांनी चौकशी करून सांगतो, असे उत्तर दिले. मात्र, नंतर वारंवार संपर्क करूनही त्यांनी याबद्दलची माहिती दिली नाही. त्यामुळे ‘देवाभाऊं’च्या नावाने कोण शहरातील भिंती रंगवत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.