अहिल्यानगरः कृषी विभागात क्षेत्रिय पातळीवर ई-ॲाफिस प्रणाली कार्यान्वित करणारा अहिल्यानगर राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि कृषी विभागाशी संबंधित सर्व कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांच्या विशेष कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व शासकीय विभागांना ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन जिल्ह्यातील विभाग प्रमुखांना सूचना दिल्या होत्या.

या उपक्रमाला अनुसरून अहिल्यानगर कृषी विभागाने पुढाकार घेत, ई-ऑफिस प्रणाली क्षेत्रीय पातळीवर प्रभावी अंमलबजावणी केली. क्षेत्रीय पातळीवर ई-ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी करणारा अहिल्यानगर पहिला जिल्हा ठरला आहे.

ई-ऑफिस प्रणालीमुळे कार्यालयीन कामकाजाचे डिजिटायझेशन होऊन कागदपत्रांचा डिजिटल प्रवाह सुकर होतो तसेच वेळेची बचत होते. निर्णयप्रक्रिया गतिमान होऊन फाइल्स आणि पत्रव्यवहार ऑनलाइन स्वरूपात जलदगतीने प्रसारित होतात त्यामुळे निर्णय अधिक वेगाने घेतले जातात. प्रत्येक टप्प्यावर दाखल केलेल्या दस्तऐवजांचा मागोवा ठेवता येतो, यामुळे जबाबदारी अधिक स्पष्ट होते. विभागांतर्गत आणि इतर प्रशासकीय यंत्रणांमध्ये संवाद आणि समन्वय सुधारतो. कामकाजात कागदाचा वापर कमी झाल्याने पर्यावरण संरक्षणाला मदत होते.

शेतकऱ्यांना जलद व सुगम सेवाअहिल्यानगर कृषी विभागाच्या पुढाकारामुळे शासकीय सेवा आणखी प्रभावी होणार असून, शेतकरी व नागरिकांना जलद आणि सुगम कृषी सेवा उपलब्ध होईल. कृषीविषयक निर्णय अधिक वेगाने घेतले जातील आणि शासकीय कामकाजाचे स्वरूप अधिक परिणामकारक आणि आधुनिक होईल. – सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर