अहिल्यानगर : जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा व १ नगरपंचायत अशा एकूण १२ पालिकांची निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा उद्या, सोमवारी जाहीर केला जाणार आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार हे प्रारूप आराखडे प्रसिद्ध केले जाणार आहेत. उद्या प्रारूप आराखडे जाहीर झाल्यानंतर लगेचच हरकती व सूचना दाखल करता येणार असून, त्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे.

नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुका गेल्या तीन चार वर्षांपासून रखडल्या आहेत. सध्या जिल्ह्यात केवळ अकोले, पारनेर व कर्जत या तीनच ठिकाणी सभागृह अस्तित्वात आहे. नगर जिल्ह्यात श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर या ३ ‘ब’ वर्ग नगरपरिषदा तर राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, शिर्डी, श्रीगोंदा, जामखेड, शेवगाव, पाथर्डी या ८ ‘क’ वर्ग नगरपरिषदा तर नेवासा नगरपंचायत यांच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा उद्या जाहीर होणार आहे. त्यापूर्वी नगरपरिषदा व नगरपंचायतींचे लोकसंख्येच्या निकषानुसार प्रभाग संख्या व सदस्य निश्चित करण्यात आली. आता प्रभाग रचना कशा असणार हे उद्या कळणार आहे. जिल्ह्यात ८ नगरपरिषदेत सदस्य संख्या ३ तर ३ नगरपरिषदांत २ ने वाढणार आहे. नेवासा नगरपंचायतची मात्र १७ च सदस्य संख्या राहणार आहे. नगरपरिषदेसाठी द्विसदस्य तर नगरपंचायतीसाठी एकसदस्य पद्धत राहणार आहे.

श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव या तीन ‘ब’ वर्ग नगरपरिषदा असून, श्रीरामपूरमध्ये १७ प्रभाग होणार असून, ३४ सदस्य संख्या राहणार आहे. कोपरगाव व संगमनेरमध्ये प्रभाग संख्या १५ झाली असून, सदस्य संख्या ३० राहणार आहे. ‘क’ वर्ग नगरपरिषदामध्ये राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, शिर्डी, श्रीगोंदा, जामखेड, शेवगाव, पाथर्डी या ८ नगरपरिषदांचा समावेश आहे. राहुरी, जामखेड, शेवगाव या तीन नगरपरिषदांसाठी १२ प्रभाग होणार असून, सदस्य संख्या २४ राहणार आहे तर पाथर्डी व राहाता या नगरपरिषदांमध्ये १० प्रभाग राहणार असून, सदस्य संख्या २० होणार आहे. देवळाली प्रवरा नगरपरिषदेत १० प्रभाग व २१ सदस्य संख्या, श्रीगोंदा नगरपरिषदेमध्ये ११ प्रभाग तर सदस्य संख्या २२ राहणार आहे. तर नव्याने स्थापन झालेल्या शिर्डी नगरपरिषदेमध्ये ११ प्रभाग राहणार असून, संख्या २३ होणार आहे. नेवासा ही एकमेव नगरपंचायत आहे. त्या ठिकाणी सदस्य संख्या ही १७ राहणार असल्याचे प्रभाग देखील १७ होणार आहेत.

वेळापत्रक

प्रभाग रचनेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे- १८ ते ३१ ऑगस्ट- प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व त्यावर हरकती व सूचना मागविणे, १ ते ८ सप्टेंबर -प्राप्त झालेल्या हरकती सूचनांवर सुनावणी घेणे, ९ ते ११ सप्टेंबर- सुनावणीनंतर हरकती व सुचनांवरील शिफारशी विचारात घेऊन अंतिम प्रभाग रचना नगरविकास विभागास सादर करणे, दि. १२ ते १८ सप्टेंबर-अंतिम केलेली प्रभाग रचना नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगास सादर करणे, दि. २६ मे ३० सप्टेंबर-राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे.