अहिल्यानगर : गेल्या सुमारे चार महिन्यांच्या कालावधीत राबवलेल्या मोहिमेत जिल्ह्याच्या शिधापत्रिकामधून सुमारे ५५ हजार जणांची नावे विविध कारणांनी वगळली गेली आहेत. तर सुमारे ८० हजार जणांची नावे शिधापत्रिकाधारकांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. जिल्ह्यास प्राप्त झालेल्या नव्या इष्टांकानुसार अद्याप सुमारे ४३ हजार जणांची नावे समाविष्ट करण्याचा जिल्ह्याचा कोटा बाकी आहे.
राज्य व केंद्र सरकार अंत्योदय व प्राधान्यक्रम गटातील कुटुंबांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचे वितरण करते. त्यानुसार अंत्योदय योजनेचे ८७ हजार ९४ शिधापत्रिकाधारक आहेत. त्याचा लाभ ३ लाख ८१ हजार ९०१ जण घेतात तर प्राधान्यक्रमाच्या गटात ६ लाख ४० हजार ५७१ शिधापत्रिका आहेत, त्याचा लाभ २५ लाख ७१ हजार ४८८ लाभधारक आहेत. त्यासाठी जिल्ह्याला गेल्या महिन्यात ६४८७ टन गहू व ९५१२ टन तांदूळ वितरित करण्यात आले होते.
यासंदर्भात माहिती देताना जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी सांगितले की, नवीन शिधापत्रिका तयार होणे व विविध कारणांनी कमी होणे ही नित्य चालणारी प्रक्रिया आहे. परंतु, जिल्ह्यात यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. मृत्यू झालेले, स्थलांतरित, विवाहित अशा विविध कारणांनी शिधापत्रिकांमधून ५५ हजार नावे वगळली गेली आहेत. तर याच कारणांसह विभक्त कुटुंब, स्थलांतरित, विवाहित आदी कारणांनी सुमारे ८० हजार नावे नव्याने समाविष्ट झालेली आहेत. गेल्या मार्चमध्ये जिल्ह्याला नवीन इष्टांक प्राप्त झाला. गेल्यावर्षीचा इष्टांकानुसार कार्ड वाटप करण्यात आले होते. तरीही नवीन इष्टांकानुसार अद्याप ४३ हजार जणांना याचा लाभ मिळू शकणार आहे.
१८ हजार कार्डधारक लाभ न घेणारे
अंत्योदय किंवा प्राधान्यक्रम गटातील शिधापत्रिका धारकांनी गेल्या तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांना वितरित करण्यात आलेले धान्य दुकानदारांकडून न घेतल्यास असे कार्ड रद्दबातल ठरवले जातात. जिल्ह्यात अशा प्रकारचे सुमारे १८ हजार कार्डधारक (सायलेंट आरसी) आहेत.
‘ई-केवायसी’ नसल्यास धान्य नाही
शिधापत्रिकाधारकांनी ‘ई-केवायसी’ न केल्यास त्यांना सप्टेंबर २०२५ पासून केंद्र व राज्य सरकारच्या सूचनेनुसार धान्य वितरण बंद होणार आहे. जिल्ह्यात सुमारे ८२ टक्के कार्डधारक ई-केवायसी केलेले आहेत. स्थलांतरित नागरिकही कोणत्याही दुकानातून ई-केवायसी करू शकतात. त्यामुळे उर्वरित नागरिकांनी ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी केले आहे.