अहिल्यानगर: ‘जलजीवन मिशन’ कार्यक्रमातील पाणीयोजनांच्या तपासणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन पथकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी येत्या महिनाअखेरपर्यंत तपासणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. योजनांच्या सद्य:स्थितीसह त्रुटी व जबाबदारी निश्चितीचा उल्लेख अहवालात करण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

जलजीवन मिशनमधील पाणीयोजनांच्या कामाबाबत लोकप्रतिनिधींसह स्थानिक पातळीवरील सरपंचांनीही तक्रारी केलेल्या आहेत. सीईओ भंडारी यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर आतापर्यंत त्यांच्याकडे किमान ३० योजनांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या तपासणीसाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हितेंद्र चव्हाण व उपकार्यकारी अभियंता सुधीर आरळकर अशी दोन स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकाने तपासणी सुरू केली आहे. सहा योजनांचे तपासणी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहेत.

तपासणी करताना पथकाने योजनेचा ठेकेदार, गावातील सरपंच, ग्रामस्थ यांनाही समवेत घ्यायचे आहे. काही किरकोळ त्रुटी व अपूर्ण कामे आढळली, तर लगेच संबंधित ठेकेदारांमार्फत पूर्ण करून घेण्याचे आदेश दिले आहेत. या तपासणीत जलवाहिन्यांची कामे योग्य पद्धतीने झाली का, पाण्याची टाक्याची गळती, वाहिन्यांची गळती, पाणी पूर्ण दबाने मिळते का, अंदाजपत्रकात समावेश असलेल्या सर्व घरांना पाणीपुरवठा होतो का, पाईप योग्य पद्धतीने गाडले गेले का अशा प्रकारे तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे.

दोन्ही पथकांनी आतापर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केलेल्या सहा ते सात अहवालांत त्रुटी आढळल्या आहेत. त्यात योजनांच्या सद्य:स्थितीचा उल्लेख आहे. मात्र त्रुटी व त्या पूर्ण करण्याची जबाबदारी कोणावर याचा उल्लेख नाही. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अहवालात त्रुटींचा व जबाबदारी निश्चितीचा उल्लेख करण्याचे आदेश दिले आहेत.

पाथर्डी, श्रीरामपूर पिछाडीवर

जलजीवन मिशन कार्यक्रमात आतापर्यंत जिल्ह्यात ८३० पाणी योजनांपैकी २७४ पूर्ण झाल्या आहेत. त्यात २५ टक्क्यांपर्यत ४ योजनांची कामे झाली, ५० टक्क्यांपर्यंत २७ योजनांची, ७५ टक्क्यांपर्यंत १२० योजनांची, तर ९९ टक्के काम पूर्ण झालेल्या ४०५ पाणीयोजना आहेत. २७४ योजनांमध्ये सर्वाधिक योजनांची कामे संगमनेर व पारनेर या दोन तालुक्यात, प्रत्येकी २९ योजना पूर्ण झाल्या आहेत तर सर्वात कमी योजना पाथर्डी तालुक्यात, केवळ ७ योजना पूर्ण आहेत. श्रीरामपूरमध्ये ९ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. घरोघरी नळजोड योजनांची संख्या १२६९ असून, त्यांपैकी ६१३ गावांमध्ये नळजोडणीची कामे पूर्ण झाली आहेत. त्यात २५ टक्क्यांपर्यंत २२, ५० टक्क्यांपर्यंत १९२, ७५ टक्क्यांपर्यंत २२०, तर २२२ गावांमध्ये ९९ टक्के नळजोडाची कामे झाली आहेत.