अहिल्यानगर: जिल्ह्याच्या दक्षिण भागातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून स्थानिक पातळीवर विकास आघाडी करून निवडणूक लढवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यासाठी खासदार नीलेश लंके यांनी पुढाकार घेतला आहे. श्रीगोंदे, राहुरी व देवळाली प्रवरा येथे अशा विकास आघाडी निर्माण झाल्या आहेत. काँग्रेसनेही महाविकास आघाडीऐवजी तीन ठिकाणी स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे.

जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायतीच्या एकूण १२ ठिकाणी निवडणुका होत आहेत. बहुतेक ठिकाणी महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांमध्ये एकमत न झाल्याने महायुती दुभंगली गेली आहे. महायुतीकडील नाराजांना खेचण्यासाठी खासदार लंके यांनी स्थानिक पातळीवर विकास आघाडी स्थापन करून निवडणूक लढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शेवगाव व पाथर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) ॲड. प्रताप ढाकणे यांच्याकडे तर जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेसने श्रीरामपूर व श्रीगोंदाची जबाबदारी आमदार हेमंत ओगले यांच्यावर सोपवली आहे.

श्रीगोंद्यात शरद पवार गटाचे बाबासाहेब भोस यांच्या नेतृत्वाखाली विकास आघाडी स्थापन करण्यात आली आहे. त्यात अन्य पक्षांच्या इच्छुकांनाही सामावून घेण्यात आले आहे. तेथे काँग्रेसने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर दावा केला आहे. अन्यथा ११ जागांची मागणी केली आहे. देवळाली प्रवरा व राहुरीमध्ये माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (शरद पवार गट) व सभापती अरुण तनपुरे (अजित पवार गट) हे काका-पुतणे एकत्र येऊन त्यांनी स्थानिक पातळीवर विकास आघाडी स्थापन करत भाजपला आव्हान दिले आहे. मात्र ही आघाडी काँग्रेसला अमान्य आहे. शेवगाव व पाथर्डीमध्ये ‘मविआ’तील काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये धुसफूस सुरू आहे. जामखेडमध्ये आमदार रोहित पवार काँग्रेसला अपेक्षित जागा देण्यास तयार नाही. त्यामुळे काँग्रेसने समविचारी पक्षांबरोबर स्थानिक आघाडी करण्यासाठी जुळवाजुळ सुरू केली आहे.

जिल्ह्याच्या उत्तर भागातील संगमनेर, राहाता, शिर्डी व कोपरगाव येथे महाविकास आघाडी झाली आहे. श्रीरामपूरमध्ये शिवसेना (ठाकर गट) सहा जागांसाठी आग्रही आहे तर काँग्रेस तीनच जागा देण्यास तयार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिढा कायम आहे. कोपरगावमध्ये महाविकास आघाडीतील शरद पवार गट व काँग्रेस यांच्यातील तिढा एक-दोन दिवसांत सुटण्याची शक्यता आहे. संगमनेरमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी निवडणुकीत उतरली आहे.

महायुतीमधील भाजप- अजित पवार गट- शिंदे गट यांच्यामध्ये किमान सहा ठिकाणी बेबनाव निर्माण झालेले आहेत. त्याचा लाभ मिळवण्यासाठी महाविकास आघाडीकडून स्थानिक पातळीवर आघाडी करण्यास प्राधान्य दिले जात आहे.