अहिल्यानगर: जिल्ह्यातील माथाडी कामगारांना आवक मालाच्या वाराईत दरवाढीचा लाभ मिळत नसल्याने असंतोष आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून मजुरीवाढ अंमलात आणली जात नसल्याचा आरोप जिल्हा हमाल पंचायत संघटनेने केला आहे. दरवाढीच्या अंमलबजावणीसाठी उद्या गुरुवारपासून कामबंद आंदोलनाचा इशारा हमाल पंयाचतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी दिला आहे.
यासंदर्भात माहिती देताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष घुले यांनी सांगितले की, अहिल्यानगर माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाने ४ जुलै २०२५ रोजी आवक मालाच्या वाराई दरवाढीबाबत परिपत्रक काढले होते. मागील २० वर्षांपासून प्रती गोणी केवळ २ रुपये मजुरी दिली जात होती. त्यामध्ये वाढ करून प्रती गोणी ३ रुपये मजुरी व लेव्हीसह (मजुरी २.२७ रु. व लेव्ही ७३ पैसे) दरवाढ करण्यात आली. ही वाढ १ ऑगस्ट २०२५ पासून पुढील ३ वर्षांसाठी म्हणजे ३१ जुलै २०२८ पर्यंत लागू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी मजुरीवाढीची अंमलबजावणी केेली नाही. यासंदर्भात ५ ऑगस्टला जिल्हा हमाल पंचायत, राज्य माथाडी वाहतूक संघटनेचे सरचिटणीस सुनील यादव, सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे प्रतिनिधी बंडू गर्जे, तसेच नगर, नेवासा, कोपरगाव, संगमनेर, राहुरी आदी तालुका बाजार समित्यांचे सचिव, आडते संघटनेचे अध्यक्ष अशोक लाटे आदींची बैठक झाली.
या बैठकीत सर्व समित्यांना कामकाज सुरळीत राहण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत आज, बुधवारी संपत असून, त्यानंतरही आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास जिल्हा हमाल पंचायतने आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करून संघटनेचे सरचिटणीस मधुकर केकाण यांनी सांगितले की, माथाडी कामगारांना आजपासून वाढीव मजुरी न दिल्यास उद्या गुरुवारपासून जिल्हाभरातील माथाडी कामगार कामबंद आंदोलन करतील.
यामुळे व्यापारी व बाजार समित्यांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. या आंदोलनादरम्यान व्यापार्यांचे अथवा इतरांचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी माथाडी कामगारांची नसून बाजार समित्या आणि संबंधित व्यापार्यांवर असेल. वीस वर्षांनंतरही मजुरी वाढ न मिळाल्याने जिल्हाभरातील माथाडी कामगारांत असंतोष आहे. संघटनेच्या मागणीची तातडीने अंमलबजावणी करा, अन्यथा गुरूवारपासून कृषी बाजार समित्यांतील व्यवहार ठप्प होतील, असा इशारा जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष घुले यांनी दिला आहे.