अहिल्यानगर : शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कुत्रे पकडून व त्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीसाठी एक गाडी व ४ कर्मचारी नियुक्त केले जातील. शहरात कुत्र्यांसाठी ‘फीडिंग पॉईंट’ तयार करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येईल. हॉटेल व स्लॉटर हाऊसमधील वेस्ट रस्त्यावर किंवा कचराकुंडीवर येणार नाही, यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले.
प्राण्यांसह नागरिकांची सुरक्षाही महत्त्वाची आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहरात मोकाट कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर नागरिक व प्राणिमित्रांच्या सूचना जाणून घेत, उपाययोजना करण्यासाठी आयुक्त डांगे यांनी बैठक आयोजित केली होती.
वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर, माजी नगरसेवक निखिल वारे, मनोज कोतकर, विनीत पाऊलबुद्धे, बाळासाहेब पवार, प्रकाश भागानगरे, काका शेळके, कोंडवाडा विभागप्रमुख दुष्यंत बत्तुल, प्राणिमित्र संघटनेचे सुमित वर्मा, श्रीमती कामत आदी उपस्थित होते. या वेळी प्राणिमित्रांनी सूचनाही करत निर्बीजीकरण शस्त्रक्रियेबाबत शंकाही उपस्थित केल्या. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, एखादी दुर्घटना घडल्यास प्राणिमित्र संघटना जबाबदारी घेणार का, असा जाब माजी नगरसेवकांनी विचारला.
मनपाने पिंपळगाव माळवी येथे १०० ते १५० कुत्र्यांना ठेवता येईल एवढ्या क्षमतेचे शेल्टर हाऊस उभारले आहे. शहरात सुमारे २५ हजार कुत्री असून, मागील वर्षभरात ५०४१ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ठेकेदार संस्थेला कुत्री पकडण्यासाठी १०.५९ लाखांचे देयक दिले. अद्याप २९ लाखांची देयके थकीत आहेत. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या शस्त्रक्रिया इन कॅमेरा केल्या जातात. प्राण्यांच्या सुरक्षेबाबत प्राणिमित्र संघटना काम करतात. मात्र, नागरिकांवर होणारे कुत्र्यांचे हल्ले दुर्लक्षित करता येणार नाहीत.
हिंस्र व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी व त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र उपाययोजना केल्या जातील. फीडिंग पॉइंटसाठी प्राणिमित्र संघटनांनी शहरात सर्वेक्षण करून कुठे पॉइंट करता येतील, याचा अहवाल द्यावा. यासाठी पुन्हा महिनाभराने एकत्रित बैठक घेऊन काही उपाययोजना केल्या जातील, असे आयुक्तांनी सांगितले.
प्राणिमित्र संघटनांना आयुक्तांनी फटकारले
मोकाट कुत्र्यांसाठी शेल्टर हाऊस व निर्बीजीकरण शस्त्रक्रियेसाठी खासगी कंपन्यांच्या ‘सीएसआर’ची मदत घेतली जाईल. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना उपचारासाठी १० हजारांपर्यंत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात येईल. मोकाट कुत्र्यांबाबत आम्ही काम करू, असे संघटना सांगतात. प्रत्यक्षात वेळ आल्यावर, आम्ही संपर्क केल्यावर प्रतिसाद मिळत नाही. महापालिकेच्या कामाची एक कार्यपद्धती आहे. इथे येऊन जे भाषण केले जाते, ते भाषणापुरतेच असते. प्रत्यक्षात काम मनपालाच करावे लागते. मनपा प्राण्यांच्या विरोधात नाही, मात्र, घटनांचे गांभीर्य पाहता नागरिकांची सुरक्षा हेच मनपाचे प्राधान्य असेल, अशा शब्दांत आयुक्त डांगे यांनी प्राणिमित्र संघटनेला सुनावले.