अहिल्यानगर : आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा ठाकरे गट व रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाने आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाचे महानगर प्रमुख किरण काळे व गवई गटाचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी ही माहिती दिली.
नगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आता शिवशक्तीबरोबर भीमशक्ती आल्यामुळे ताकद वाढली आहे. या माध्यमातून मनपा निवडणूक जिंकू, असा विश्वास किरण काळे यांनी व्यक्त केला. आंबेडकरी समाज शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा राहील. समाजाला शिवसेनाच न्याय देऊ शकते, असा विश्वास असल्याने एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे सुशांत म्हस्के यांनी म्हटले आहे. निवडणुकीत अन्य कुणाशी आघाडी करायची याचा निर्णय सर्वस्वी शिवसेनेने घ्यावा. त्या निर्णयासोबत असू. आम्ही शिवसेनेचा छोटा भाऊ आहोत.
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी म्हणाले, तत्कालीन पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सगळ्यात आधी शिवशक्ती व भीमशक्तीचा प्रयोग केला. आता तो नगर शहरातही झाला आहे. आगामी काळात आम्ही ग्रामीण जिल्ह्यात हा प्रयोग करणार आहोत. मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीबाबत इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी ठाकरे गटाची, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची लवकरच बैठक आयोजित करणार असल्याचे राजेंद्र दळवी व किरण काळे यांनी सांगितले.
