अहिल्यानगर : जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचालित न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय व सनदी लेखापाल संघटनेची नगर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात लेखा संग्रहालय (अकाउंटिंग म्युझिअम) स्थापन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे व संघटनेच्या अखिल भारतीय शाखेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष केतन सैया यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी रामचंद्र दरे म्हणाले, ‘व्यवहाराच्या पद्धती बदलत आहेत. अकाउंटन्सीतील हे बदल, जुनी नाणी, चलन, पदके, जुने ताळेबंद, धनादेश, खातेपुस्तिका यांसारख्या अकाउंटन्सीसंबंधी वस्तू एकाच छताखाली पाहण्याची आणि अभ्यासण्याची संधी या म्युझिअममुळे विद्यार्थ्यांना मिळणार आहे.’ केतन सैया यांनी सांगितले की, चार्टर्ड अकाउंटंट क्षेत्राकडे अनेक विद्यार्थी आकर्षित होत आहेत. वाणिज्य शाखेतून नोकरी आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत असल्यामुळे विद्यार्थी बेरोजगार राहणार नाहीत. संघटना विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवत आहे.
प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी सांगितले, की वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना गौरवशाली भारतीय ज्ञानपरंपरेची ओळख करून देणे आणि अकाउंट विषयातील काळानुरूप झालेले बदल समजून घेण्यासाठी हे म्युझिअम उपयुक्त ठरेल. संस्थेचे सचिव विश्वास आठरे पाटील, सहसचिव जयंत वाघ यांचे भाषण झाले. वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. एस. बी. कळमकर यांनी स्वागत केले.