अहिल्यानगर : नगर तालुका बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी महापौर संदीप कोतकर यांचे वडील भानुदास कोतकर यांनी अचानक भाजपच्या व्यासपीठावर लावलेली हजेरी म्हणजे भाजपने महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर (अजित पवार गट) आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने टाकलेला दबाव असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

भाजप नेते तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत कोतकर यांनी लावलेली व्यासपीठावरील हजेरी ही भाजपमधील निष्ठावानांना बसलेला धक्काच होता. या हजेरीमुळे केडगाव उपनगरातील कोतकर गटाचा भाजपला पाठिंबा, असल्याचा अर्थ लावला जात आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. सर्वच पक्षात आवक-जावक सुरू झालेली आहे.

शहरातील केडगाव उपनगरात मनपा सदस्य पदाच्या ८ जागा आहेत. वादग्रस्त घटनांच्या पार्श्वभूमीवर कोतकर गटाचे केडगाव उपनगरातील प्राबल्य काही प्रमाणात टिकून आहे. भानुदास कोतकर यांची हजेरी म्हणजे जागा वाटपाच्या दृष्टीने महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टाकलेला दबाव असल्याचे मानले जाते. यापूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत कोतकर गटाचे पाच सदस्य ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करते झाले व त्यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवली होती. कोतकर यांच्या उपस्थितीमुळे यंदाही अशी काही घटना घडल्यास त्याचे नगरकरांना आश्चर्य वाटणार नाही.

केडगाव उपनगरासह शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी भानुदास कोतकर समर्थकांविरुद्ध अनेक वर्ष लढा दिला. भाजपच्या व्यासपीठावर कोतकर यांनी लावलेली उपस्थिती त्यांच्यासाठी धक्कादायक होती. कोतकर समर्थक गट गेल्या काही महिन्यांपासून नगर शहरात पुन्हा सक्रिय होण्याच्या प्रयत्नात आहे. हे समर्थक भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) असे विखुरलेले आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीतही माजी महापौर कोतकर यांनी उमेदवारीसाठी जोरदार वातावरण निर्मिती केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आघाडीतील घटक पक्षांच्या संपर्कात ते होते. आता महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी भाजपच्या व्यासपीठावर उपस्थिती लावली. आगामी महापालिका निवडणुकीत आपल्या समर्थकांना स्थान मिळवून देण्याचा हा प्रयत्न असल्याचेही बोलले जाते.

मंत्री विखे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात काही जणांचे पक्षप्रवेश झाले. अशा कार्यक्रमात भानुदास कोतकर व्यासपीठावर उपस्थित होते. पक्षप्रवेश केला का अशी विचारणा भानुदास कोतकर यांना केले असता, त्यांनी त्याचा इन्कार केला. जिल्ह्यात होणाऱ्या नगरपंचायत व नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, हे सर्व प्रवेश मुंबई प्रदेश कार्यालयात होत आहेत.

मात्र काल ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश स्थानिक पातळीवरच करून घेण्यात आले. याशिवाय विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे काल नगरमध्ये उपस्थित असूनही पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमास अनुपस्थित राहिले, याचीही चर्चा होत आहे.

मंत्र्यांना भेटण्यासाठी आले होते – अनिल मोहिते

माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या भाजपच्या व्यासपीठावरील उपस्थितीबद्दल भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कोतकर यांचे मंत्री विखे यांच्याकडे काम होते. त्यासाठी ते आले होते. ते उपस्थित झाल्यानंतर त्यांना व्यासपीठावर बोलावण्यात आले. मात्र त्यांनी प्रवेश केलेला नाही.