अहिल्यानगर:नागरिकांशी थेट संवाद साधून विविध योजनांचा लाभ देणाऱ्या, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जिल्हा प्रशासनाच्या तीन नावीन्यपूर्ण डिजिटल उपक्रमांची सुरुवात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते आज, शुक्रवारी स्वातंत्र्यदिनी करण्यात आली.

नागरिकांशी थेट व तातडीचा संवाद साधून योजना अंमलबजावणीत पारदर्शकता वाढवण्यासाठी ‘जिल्हाधिकारी कार्यालय- संवाद सेतू’ यामार्फत विविध विभागांचे सेवा आवश्यक कागदपत्रांची यादी, नजीकच्या सेतू केंद्रांची माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने व्हाट्सअपवर मिळणार आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत व्हाट्सअप चॅनल सुरू करण्यात आले आहे.

‘व्हाट्सअप चॅनल- आपल्या शिवार’ मार्फत प्रशासनाचे अद्ययावत माहिती, आपत्तीविषयक सूचना तसेच राज्य सरकारच्या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे, सामाजिक न्याय विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या प्रगतीची माहिती लाभार्थ्यांना मोबाईलवर पाहण्याची सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे वेळ व खर्च वाचेल तसेच पारदर्शकता वाढेल अशी अपेक्षा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली.

दरम्यान जिल्हा पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री विखे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया जिल्हा पोलीस अध्यक्ष सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महापालिका आयुक्त डॉ. यशवंत डांगे, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री विखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सेना दलात कार्यरत असताना वीरमरण आलेले शहीद जवान रामचंद्र लहू साठे (लोणी हवेली, ता. पारनेर), रामदास साहेबराव बडे (मेंढवन, ता. संगमनेर) व संदीप पांडुरंग गायकर (ब्राह्मणवाडा, ता. अकोले) यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. मे महिन्यातील अतिवृष्टीत जीवाची पर्वा न करता दोन महिला व इतर नागरिकांना जीवदान देणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, पोलिस अंमलदार नितीन गांगुर्डे व अन्सार शेख यांचाही सन्मान करण्यात आला.

मुख्यमंत्र्यी १०० दिवसांच्या विशेष कार्यालयीन सुधारणा मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणारे २३ अधिकारी ल कर्मचारी, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे ४९ अधिकारी व कर्मचारी, १९ जिवंत अवयवदात्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या जिल्ह्यातील अठरा विद्यार्थ्यांचे गुणगौरवही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.