कर्जत : नगराध्यक्ष पदासाठी विहित मुदतीत आज भाजपचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या रोहिणी घुले यांनी, तर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे यांनी उमेदवारीअर्ज दाखल केला. दोन्ही गटांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी अजूनही चुरस असल्याचे दिसते. दरम्यान, उमेदवारीअर्ज मागे घेण्याची मुदत उद्या, मंगळवारी दुपारी २ पर्यंत आहे. त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल.
राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) ८, काँग्रेसच्या ३ व भाजप २ अशा १३ नगरसेवकांनी राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अविश्वास ठराव दाखल केला. मात्र, उषा राऊत यांनी राजीनामा दिल्यानंतर आता नवीन नगराध्यक्षपदासाठी दि. २ मे रोजी निवड सभा होत आहे. आज दुपारी २ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या मुदतीत दोघींनी अर्ज दाखल केले.
नगराध्यक्ष पदासाठी फुटलेल्या नगरसेवकांपैकी अनेक जण इच्छुक होते. त्यामुळे राम शिंदे यांची डोकेदुखी चांगलीच वाढली होती. अखेर उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदर म्हणजे आज सकाळी ११ वा. राम शिंदे यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपद उर्वरित १८ महिन्यांच्या काळासाठी समसमान वाटून देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार नगराध्यक्ष म्हणून पहिली संधी रोहिणी सचिन घुले यांना, तर उपनगराध्यक्ष म्हणून संतोष मेहत्रे यांची नावे जाहीर केली.
दुसऱ्या टप्प्यात छाया सुनील शेलार यांना नगराध्यक्ष पदाची संधी देण्यात येणार असून त्यावेळी उपनगराध्यक्ष पद कोण होणार हे नंतर ठरवले जाईल. तसेच संतोष मेहत्रे यांच्याकडील गटनेतेपद दुसऱ्या नगरसेवकाला देणार असे जाहीर केले.त्यानंतर रोहिणी घुले येथे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी समर्थकांसह दाखल झाल्या. त्यांच्यासमवेत प्रवीण घुले, उपगटनेते सतीश पाटील, सचिन कुलथे, नगरसेविका सुवर्णा सुपेकर, प्रवीण घुले, महेंद्र धांडे आदी होते. रोहिणी सचिन घुले यांनी एकूण दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. सूचक भास्कर भैलुमे व अनुमोदक संतोष मेहेत्रे, तर दुसरा उमेदवारी अर्ज प्रतिभा भैलुमे यांनी भरला. त्याचे सूचक नामदेव राऊत व अनुमोदक उषा अक्षय राऊत असल्याची माहिती मुख्याधिकारी अक्षय जायभाय यांनी दिली. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अर्जांची छाननी झाली. दोन्ही अर्ज वैध ठरले आहेत.