अहिल्यानगर : वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी गेले काही दिवस आक्रमकता दाखवणाऱ्या विरोधकांनी प्रत्यक्षात सभेत मात्र गोलमाल भूमिका घेतल्याने जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची आज, रविवारी झालेली सभा अनपेक्षितपणे शांततेत झाली. सत्ताधारी संचालकांमधील फाटाफुटीवर विरोधकांनी शेरेबाजी केली तर अनावश्यक खर्चावरून शाब्दिक चकमकीही झडल्या. बँकेला शेड्युल दर्जा घेण्यास मात्र विरोधी मंडळानी विरोध दर्शवला.

बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेली १०६ वी वार्षिक सभा दीर्घकाळ चालली. बँकेच्या नावात अहिल्यानगर असा बदल करणे, बँकेचे कार्यक्षेत्र राज्य करणे, शेड्युल बँक दर्जा मिळवणे, स्वीकृत संचालकपदी दोन जणांची नियुक्ती करणे, शुभमंगल योजनेचा लाभ एकाच कुटुंबात दोन सभासद असतील तर स्वतंत्र देणे, स्टाफिंग पॅटर्नमध्ये बदल करणे, अशा चार पोटनियम दुरुस्त्या संचालक मंडळांनी प्रस्तावित केल्या होत्या.

विरोधकांच्या आक्षेपांना अध्यक्ष तापकीर यांच्याऐवजी मंडळाचे नेते बापू तांबे यांनीच परस्पर उत्तरे दिली. प्रमुख विरोधक डॉ. संजय कळमकर यांनी वार्षिक सभेतील हे आपले शेवटचे भाषण असल्याचे सांगताना शेड्युल्ड बँक म्हणजे घर चांगले चालले असताना नको ते पाहुणे घरात घेऊन विस्फोट करणे असल्याने सभासदांनी विचार करून निर्णय घ्यावा व शेड्युल्ड बँक विषय मागे ठेवावा, असे आवाहन केले.

अध्यक्ष तापकीर यांनी एकाच वेळी एक ते आठ विषय मंजुरीस टाकल्याने काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नंतर सभासदांना बोलण्यास परवानगी दिल्याने गुद्द्यांच्या तयारीत असलेले शिक्षक सभासद मुद्द्यांवर आले. दोन टक्के नफा कमी झाला, २ कोटी ५० लाखांच्या तरतुदी अनावश्यक करण्यात आल्या. बँक संगणकृत असताना १२ लाख रुपये छपाईवर खर्च करण्यात आले, प्रवास भत्त्यावर २९ लाख रुपये खर्च झाला, नेत्यांच्या सत्कार समारंभासाठी ६ लाख रुपये खर्च करण्यात आला, असे अनेक हरकतीचे मुद्दे उपस्थित करण्यात आले.

विरोधी गटाचे प्रवीण ठुबे यांनी सत्ताधारी गटाशी जुळवून घेत असल्याचे संकेत आपल्या मनोगतातून दिले. प्रवीण ठोंबरे, विकास डावखरे, अविनाश निंभोरे, रघुनाथ हावरे, भास्कर नरसाळे आदींनी विविध हरकतीचे मुद्दे उपस्थित केले. मिलिंद खंडीजोड, संतोष खामकर, प्रदीप गावडे, मनीषा वाकचौरे, नवनाथ अडसूळ, आबा दळवी, किरण निंबाळकर, रघुनाथ झावरे, धनाजी जावळे, कैलास ठाणगे, अशोक निमसे, अर्जुन शिरसाठ, आबा जगताप, संतोष दुशिंगे, विद्युलता आढाव, गोकुळ कळमकर आदींनी विविध सूचना केल्या.

नोकरभरती नाही

विरोधकांच्या आक्षेपांवर उत्तर देताना सत्ताधाऱ्यांचे नेते बापू तांबे यांनी सांगितले की, बँकेचा व्यवसाय १८०० कोटींवर गेला, उत्पन्नात वाढ झाली तसा खर्चही वाढला आहे. परंतु, विरोधक दिशाभूल करत आहेत. स्टाफिंग पॅटर्ननुसार १४५ पदे निर्माण होतील, सध्या ११५ मंजूर आहेत. परंतु, प्रत्यक्षात ८५ कार्यरत आहेत.

स्टाफिंग पॅटर्न आरबीआयचे नियमानुसार केला जात आहे, याचा अर्थ भरती केली जाणार आहे असा नाही. जे बॅंकेच्या कारभाराबद्दल बोलतात त्यांनी ते करून दाखवले तर मी परत येणार नाही आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनाही राजीनामा देण्यास सांगतो. परंतु, विरोधक दिशाभूल करत आहेत. राज्य कार्यक्षेत्र झाले तरी सभासद जिल्ह्यातीलच असणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तांबे-कळमकर टीका टिप्पणी

बापू तांबे यांनी डॉ. संजय कळमकर यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, मी हुकूमशाह असल्याचा आरोप केला जातो. साहित्यिकाने साहित्य क्षेत्रात नाव कमवावे, मोठे व्हावे. परंतु खोटे बोलून दिशाभूल करू नये. त्याला प्रत्युत्तर देताना कळमकर म्हणाले, साहित्य हे शाश्वत आहे बँकेचे राजकारण अस्वस्थ आहे.