अहिल्यानगरः गडचिरोली ते अमरावती मार्गे अहिल्यानगर हा प्रवास माझ्यासाठी निश्चितच मार्गदर्शक आहे. अनेक अधिकारी व विभागांसमवेत काम करताना जिल्हा परिषदेची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न केला. इथल्या विविध उपक्रम व प्रगतीचा अभिमान राहील. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमध्ये जिल्हा अग्रेसर ठेवण्यात प्रत्येक अधिकारी, कर्मचारी व सहकारी संस्थांची साथ मिळाली. अशा जिल्ह्याने मला घडवले आणि प्रेम देखील दिले, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले.
जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने मावळते सीईओ येरेकर यांचा शुभेच्छा सोहळा व नूतन सीईओ आनंद भंडारी यांचा स्वागत सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी येरेकर बोलत होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लंगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, येरेकर यांचे वडील मुकुंदराव येरेकर, आई नंदाताई येरेकर, पत्नी दीपाली येरेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, शिक्षणाधिकारी अशोक कडूस (माध्यमिक) व भास्कर पाटील (प्राथमिक) समाजकल्याण अधिकारी देविदास कोकाटे तसेच विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
विविध कर्मचारी संस्था, संघटनांनी येरेकर व भंडारी यांचा सत्कार केला. फुलांच्या पायघड्या व पुष्प वर्षावात तसेच तुतारीच्या निनादात येरेकर व भंडारी यांचे स्वागत करण्यात आले. राहुल शेळके यांनी प्रास्ताविक केले. जयश्री कार्ले, नानासाहेब रोहकले, डॉ. संजय कळमकर, डॉ. दिघे, गायसमुद्रे, दशरथ शिंदे आदींची भाषणे झाली.
अमरावती जिल्हाधिकारी पदासाठी शुभेच्छा
सेवेच्या कमी कालावधीत उच्चतम असा प्रशासकीय अनुभव आशिष येरेकर यांनी प्राप्त केला. राज्यातील मोजक्या कार्यक्षम, कर्तृत्ववान अधिकाऱ्यांमध्ये येरेकर यांचे नाव घेतले जाते. अमरावती जिल्हाधिकारीपदी देखील सर्वोत्कृष्ट काम करून राज्यात निश्चितच ते बहुमान प्राप्त करतील, अशा शुभेच्छा नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिल्या.