दुष्काळग्रस्त मराठवाडय़ातील जायकवाडी धरणात अहमदनगर जिल्ह्य़ातील धरणांमधून पाणी सोडण्यात येऊ नये, या मागणीकरता नगर जिल्ह्य़ातील आमदारांनी मंगळवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. त्याची दखल घेत या मुद्दय़ावर तोडगा काढण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात बैठक झाली. मात्र, त्यातून काही तोडगा निघाला नाही. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी वाटपाच्या संदर्भात न्यायालयाीन निर्णयाचे पालन केले जाणार असल्याचे स्पष्ट केले.  
अहमदनगर जिल्ह्य़ातील मुळा, भंडारदरा व निळवंडे या धरणांमधील पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हे पाणी शेती व औद्योगिकीकरणासाठी वापरण्यात येणार असल्याने, जायकवाडी धरणात ते पाणी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी नगर जिल्ह्य़ातील काही आमदारांनी केली. मागणी रेटण्यासाठी आमदार बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे व शिवाजीराव कर्डिले यांनी विधानभवनाच्या पाय-यांवर निदर्शने केलीत. सभागृहांचे कामकाज स्थगित होईपर्यंत या आमदारांची निदर्शने सुरूच होती. या आंदोलनाची दखल घेत जलसंपदा मंत्र्यांच्या दालनात मंगळवारी बैठक झाली. मात्र, यातून काहीही तोडगा निघाला नाही. आज, बुधवारी पुन्हा याच मुद्दय़ावर बैठक होणार आहे.
नगर जिल्ह्य़ात आंदोलनांना धार
नगर : जायकवाडीचे पाणी थांबवण्यासाठी जिल्ह्य़ात राज्य सरकारच्या विरोधातील असंतोष संघटित होत असतानाच आता आंदोलनाला अधिक धार येऊ लागली आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायलयाने दिलेल्या निकालास पदमश्री विखे कारखान्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. संगमनेरकरांनी भंडारदऱ्याचे पाणी तालुक्याच्या पुढे न जाऊ देण्याचा इशारा दिला असून श्रीरामपूरमध्येही मंगळवारी घेराव घालण्यात आला. भंडरदरा व मुळा धरणातून मराठवाडय़ातील जायकवाडीसाठी सोडण्यात आलेले पाणी थांबवणे विविध पातळ्यांवर मुश्कील झाले असले तरी नगर जिल्ह्य़ातील आंदोलनांची धार कमी झालेली नाही. भंडारदरा धरणातून सोडलेल्या पाण्याने पुढचे निळवंडे धरण भरून घेतले जात आहे. ते पूर्ण भरल्यानंतरच हे पाणी पुढे प्रवरा नदीद्वारे जायकवाडी झेपावेल. मात्र संगमनेर तालुक्यात पोणी पोहोचेपर्यंत धरणाचे चाक बंद करू असा इशारा दिला आहे.