संगमनेर : बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका ३४ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रामनाथ सूर्यभान गुरुकुले ( रा.सावरगाव तळ ) असे मयत युवकाचे नाव आहे. गुरुकुले यांच्या छातीपासून डोक्यापर्यंतचा सर्व भाग लचके तोडत बिबट्याने खाऊन टाकला. संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मानवी बळी जाण्याची या वर्षातली ही चौथी घटना ठरली.

हिवरगाव पावसा शिवारात एका ठिकाणी एक दुचाकी उभी केलेली असून शेजारी चपला पडलेल्या आहेत आणि रक्ताचे डागही पडलेले आहेत, अशी माहिती तेथील रहिवाशांनी संगमनेर पोलिसांना दिली होती. तालुका पोलीस ठाण्यातील पोलिस हवालदार अमित महाजन, आशिष आरवडे, संगमनेर वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे हे देखील तेथे पोहोचले. पोलिसांनी दुचाकी उभ्या असलेल्या ठिकाणापासून काही अंतर पुढे जाऊन पाहत असताना गवताला, दगडांना रक्ताचे डाग लागलेले दिसले. त्यानंतर छिन्नविछिन्न अवस्थेत एकाचा मृतदेह त्यांना आढळून आला. शरीरावरील अनेक ठिकाणी गंभीर जखमा झालेल्या होत्या. छातीपासून डोक्यापर्यंतचा भाग पूर्णतः लचके तोडून खाल्ल्याचे दिसून आले. संबंधितांची ओळख पटवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असता त्याचे नाव रामनाथ गुरुकुले असल्याचे निष्पन्न झाले. प्रथमदर्शनी हा प्रकार बिबट्याने केलेल्या हल्ल्यातच झाला असल्याचा कयास स्थानिक रहिवाशी, पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. याशिवाय अन्य हिंस्र प्राण्याने देखील हल्ला केलेला असल्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली. उत्तरीय तपासणीनंतर यावर प्रकाश पडणार आहे. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. गणेश दादाभाऊ शिरतार (रा. सावरगाव तळ ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सहायक फौजदार बी. वाय. टोपले अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा – रत्नागिरी : भाट्ये समुद्रकिनारी अटलबिहारी वाजपेयींचे वाळूशिल्प

दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात मानवी मृत्यू होण्याची वर्षभरातली ही संगमनेर तालुक्यातील चौथी घटना आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी हिवरगाव पावसालगतच्या देवगाव शिवारात सायंकाळच्या वेळी बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा बळी गेला होता. त्यावेळी पंचक्रोशीतील संतप्त गावकऱ्यांनी मोठे रास्ता रोको आंदोलन केले होते. तत्कालीन आमदार बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी जात लोकांना शांत करत तत्कालीन महसूल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मोबाईलवरून संपर्क करत घटनेची माहिती दिली होती. सदरचा नरभक्षक बिबट्या लवकरात लवकर पकडून लोकांना दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली होती.

हेही वाचा – औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र एक नंबरलाच राहणार – उद्योगमंत्री उदय सामंत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुनगंटीवार यांनी कारवाईचे आदेशही दिले होते. मात्र दुर्दैवाने त्यातून पुढे काहीही निष्पन्न झाले नाही. त्यापूर्वीही बिबट्याच्या हल्ल्यात दोघांना आपला जीव गमवावा लागला होता. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पाळलेली कुत्री बिबट्यांनी फस्त केली आहेत. तालुक्यामध्ये दिवसेंदिवस मानव आणि बिबट्या संघर्ष वाढत असून लोकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने आणि दिवसा वीज नसल्याने अनेक ठिकाणी शेताला पाणी देण्यासाठी रात्री जावे लागते. याशिवाय दूध संकलन केंद्रावर दूध घालण्यासाठी अनेक दूध उत्पादकांना भल्या पहाटे आणि सायंकाळी उशिरा जावे लागते. बिबट्याची दहशत असली तरी कामे थांबत नसल्याने जीव मुठीत धरून शेतकरी कशीबशी आपली कामे उरकत आहेत. यावर दीर्घकालीन कायमस्वरुपी उपाय काढला जावा अशी जनतेची मागणी आहे.