HMPV Virus Nagpur Maharashtra Case: नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांना ‘एचएमपीव्ही’ असल्याचे खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत पुढे आले आहे. पण नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने आयसीएमआरच्या प्रयोगशाळेत या रुग्णांची पुन्हा तपासणी करूनच या रुग्णाच्या नेमक्या आजाराची माहिती कळू शकणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूरचे संचालक प्रशांत जोशी यांनी याबद्दल महत्तवाची माहिती दिली. ते म्हणाले, “आपल्याकडे ‘एचएमपीव्ही’ हा २००१ पासून अस्तित्वात आहे. सर्दी, खोकला आणि इतर संसर्ग होतात, ते याच विषाणूमुळे होतात. या आजार सर्वसाधारण स्वरुपाचे आहेत. नागपूरमध्ये आता जे रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यात ‘एचएमपीव्ही’ विषाणूचे म्युटेशन झाले आहे की नाही? याची तपासणी केली जाईल.”

हे वाचा >> ‘जिनोम सिक्वेंसिंग’ काय आहे? ओमायक्रॉनसह करोनाच्या इतर विषाणूंची चाचणी कशी करतात?

कोणत्या वयोगटातील लोकांना संभाव्य धोका?

‘एचएमपीव्ही’ विषाणूची बाधा सध्या लहान मुलांमध्ये होताना दिसत आहे. नेमका कोणत्या वयोगटातील लोकांना याचा संसर्ग होऊ शकतो, याबद्दल माहिती प्रशांत जोशी म्हणाले की, लहान मुले आणि ६५ वर्षांवरील वृद्धांनी आपली काळजी घेणे गरजेचे आहे. काळजी घेण्याची आवश्यकता असली तरी भीतीचे कोणतेही कारण नाही, कारण विषाणूचे म्युटेशन झाल्याचा कोणताही पुरावा अद्याप आपल्यासमोर आलेला नाही. त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.

प्रशांत जोशी पुढे म्हणाले की, नागपूरमध्ये जे संशयित रुग्ण आढळले आहेत त्यांचे नमुने घेण्यात आले असून त्याची जिनोम सिक्वेंसिंग चाचणी केली जाणार आहे. या चाचणीच्या माध्यमातून विषाणूच्या जनुकीय बदलाबाबत महत्त्वाची माहिती मिळू शकेल.

हे वाचा >> HMPV विषाणूची लक्षणं काय? लागण झाल्यास उपाय काय? वाचा काय सांगतात तज्ज्ञ…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपुरमधील मेडिट्रिना या खासगी रुग्णालयात दोन लहान मुलांचा रिपोर्ट एचएमपीव्ही पॉझिटिव्ह आल्याचे खासगी रुग्णलायातून सांगितले जात आहे. एक सात वर्षीय मुलगा आणि १४ वर्षीय मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता. दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली नाही. दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याची माहिती मिळत आहे. खासगी प्रयोगशाळेत या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ही आला असला तरी सदर रुग्णांची पुन्हा एकदा तपासणी एम्समधील आयसीएमआरद्वारा संचालित प्रयोगशाळेत केली जाणार आहे.