Ajit Pawar on Chief Minister Position : “मलाही मुख्यमंत्री बनायचं आहे, पण योग जुळून येत नाही”, अशी खंत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली. ते महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५’ च्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
ज्येष्ठ महिला पत्रकार राही भिडे यांनी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळावी, अशी आशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त केली. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “महिला मुख्यमंत्री व्हावी असं प्रत्येकाला वाटतं. पण तो योगही जुळून यावा लागतो. मलाही वाटतं मुख्यमंत्री व्हावं, पण कुठे जतमंय? त्यामुळे कधी ना कधी योग येईल”, असं मिश्किलपणे म्हणत त्यांनी त्यांच्या मनातील खदखदही व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, “जसं ममता बॅनर्जी, जयललिता यांनी स्वतःच्या ताकदीवर राज्य मिळवलं. जयललिता यांनी त्रासावर मात करून अम्मा नावाने लोकप्रिय झाल्या. परंतु, अशा कितीतरी महिला देशातील विविध राज्यात मुख्यमंत्री झाल्या. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथंही महिला मुख्यमंत्री होईल. सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, ताराराणी या महाराष्ट्राला मिळाल्या आहेत. त्यांचं कर्तृत्व महाराष्ट्राने पाहिलं आहे, त्यामुळे तो (महाराष्ट्रातही महिला मुख्यमंत्री होईल) दिवसही लांब असेल असं वाटत नाही.”
राज्यात अनेक पक्ष होऊन गेले. अनेकवेळा आमचे वैचारिक मतभेद झाले, पण मनभेद होता कामा नये. राजकीय नेत्यांनी राजकीय सौहार्द पाळली पाहिजे. अनेक नेत्यांच्या मध्ये राजकारणामध्ये राजकारणापलिकडे जाऊन मैत्रीची उदाहरणे पाहिली आहेत, असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवार सहावेळा उपमुख्यमंत्री
दरम्यान, अजित पवार आतापर्यंत सहावेळा उपमुख्यमंत्री राहिले आहेत. २०१० साली काँग्रेस सरकारच्या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारकमध्ये ते उपमुख्यमंत्री होती. त्यानंतर, २०१२ मध्ये पुन्हा ते उपमुख्यमंत्री झाले. नोव्हेंबर २०१९ मध्ये भाजपाबरोबर गेलेल्या अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र, हे सरकार अल्पकाळच टिकलं. त्यानंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सरकारचा गाडा हाकला. तसंच, २०२२ मध्ये अजित पवारांनी बंड करत भाजपाला साथ दिली. त्यावेळीही ते एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री झाले. तर, आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकारने त्यांच्या गळ्यात पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची माळ घातली. त्यामुळे गेल्या सहा टर्ममध्ये उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांना आता मुख्यमंत्री पदाची आस लागलेली आहे. याबाबत त्यांनी याआधीही अनेकवेळा खंत व्यक्त केली आहे.