Ajit Pawar : जालना येथे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एक पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी ताब्यात घेतलेल्या एका आंदोलकास धावत जाऊन फिल्मी स्टाईल पद्धतीने पाठीमागून लाथ घातल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओवरून चांगलाच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान या प्रकाराबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, “आमच्या पोलिसांची काही नियमावली ठरलेली आहे, त्यानुसार कारवाई होईल. वास्तविक असं कोणी लाथ मारायची नसते. कायदा कोणी हातात घ्यायचा नसतो. कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या यंत्रणेची असते त्या यंत्रणेनेदेखील माणुसकीला धरून काम केले पाहिजे अशी आमच्या सरकारची भूमिका आहे,” असे अजित पवार म्हणाले आहेत.
नेमकं काय झालं होतं?
पोलिस उपअधीक्षक कुलकर्णी यांनी ज्याच्या कमरेत लाथ घातली त्याचे नाव गोपाल चौधरी असून गेले अनेक दिवस कौटुंबिक प्रकरणातील न्यायासाठी त्याचे जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु होते. न्यायाच्या मागणीसाठी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयल करीत करताना पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले होते.त्यानंतर त्याला घेऊन जाताना उपअधीक्षक कुलकर्णी यांनी पाठीमागून धावत येऊन त्याच्या कमरेत लाथ घातल्याचा व्हिडीओ समोर आला होता.
मेट्रो सेवेच्या वेळेत वाढ
दरम्यान अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या काळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. गणेशोत्सव महायुतीच्या सरकारने राज्योत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारची सगळी यंत्रणा झोकून देऊन करणार यासाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून गणेश उत्सवाच्या काळात शहरातील मेट्रो सेवा सकाळी ६ ते रात्री २ वाजेपर्यंत सुरू राहाणार असल्याची माहिती देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. इतकेच नाही तर शेवटच्या दिवशी म्हणजेच गणेश विसर्जनाच्या दिवशी ही सेवा पूर्णपणे २४ तास सुरू ठेवण्याचा आमचा निर्णय झाला आहे, असेही अजित पवार म्हणाले.
तसेच नागरिक मानाचे गणपती जेव्हा पाहायला जातील तेव्हा त्यांनी कोणत्या स्टेशनला चढावं आणि कुठं उतरावं, जेणेकरून त्यांना हे गणपती पाहाता येतील याबद्दल मेट्रोच्या वतीने आम्ही माध्यमांमध्ये जाहीर करणार आहोत, असेही अजित पवार यांनी सांगितले.