Ajit Pawar Reaction on Viral Video of IPS Anjana Krishna: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला दम दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाद उद्भवला होता. यानिमित्ताने विरोधकांनी अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला. अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला कर्तव्यापासून रोखण्याचे काम अजित पवारांनी केले, असा आरोप विरोधक करत होते. यावर आता अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.
अजित पवार यांच्या एक्स हँडलवर याबाबत एक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टच्या माध्यमातून अजित पवार यांनी आपल्यावरील टिकेला उत्तर दिले आहे.
अजित पवार म्हणाले, “सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता.”
अजित पवार पुढे म्हणाले, “आपल्या पोलीस दलाबद्दल तसेच धैर्याने आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचे राज्य हेच सर्वात महत्त्वाचे आहे.”
“मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे”, असेही अजित पवार पुढे म्हणाले.
प्रकरण काय आहे?
सोलापूरमधील मुरूमाच्या उत्खननाविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या अंजना कृष्णा यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून संवाद साधला होता. यावेळी अजित पवार म्हणाले की, ऐका, मी उपमुख्यमंत्री बोलत आहे. मी तुम्हाला आदेश देतो की, कारवाई रोखा.
मात्र कार्यकर्त्याच्या मोबाइलवर फोन आल्यामुळे पोलीस उपअधीक्षक यांनी अजित पवारांना ओळखले नाही आणि त्यांनी आपल्या फोनवर फोन का नाही केला? असा प्रश्न विचारला. यावर अजित पवार संतापले आणि त्यांनी तुमच्यावर कारवाई करू, असे संतापून म्हटले.
“तुम्हाला मला पाहायचे आहे का? तुमचा मोबाइल नंबर द्या, तुम्हाला व्हॉट्सअप कॉल करतो आणि माझा चेहरा दाखवतो. तुमची एवढी हिंमत झाली का?”, असेही अजित पवार यावेळी म्हणाले. त्यानंतर अंजना कृष्णा यांना व्हिडीओ कॉल करून अजित पवार यांनी त्यांना कारवाई रोखण्याचे थेट आदेश दिले.
आता या प्रकरणातील दोन्ही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.