वाई : अयोध्या दौरा ही मुख्यमंत्र्यांची फालतुगिरी आहे. आताच्या ताज्या प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांचा हा अयोध्या दौरा असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.पवार आज साताऱ्याच्या दौऱ्यावर असून, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला त्यांनी भेट दिली. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांतील बँकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. संचालकांची बैठक घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. या वेळी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी सरकाळे, संचालक बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, प्रदीप विधाते, दत्ता धमाळ, कांचन साळुंखे, सुनील खात्री, रामचंद्र लेंभे आदी उपस्थित होते. देशात पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या या बँकेचे कामकाज अतिशय उत्कृष्ट सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
ते म्हणाले, की प्रत्येकाला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही अयोध्येला रामाच्या दर्शनासाठी गेले. मात्र, आम्ही कधी इकडे जाणार तिकडे जाणार हे सांगत नाही. आम्ही पण मंदिरात जातो, पण पब्लिसिटी करत नाही. जातीचा, धर्माचा वापर माणसांमध्ये फूट पाडण्यास, द्वेष पसरवण्यास कोणी करू नये एवढीच आमची अपेक्षा आहे.
या वेळी अजित पवार यांनीही अदानींची पाठराखण केली. ‘‘माझे त्यांच्याबरोबरचे छायाचित्र कोणीतरी ट्वीट केले. मी ‘अंडरवल्र्ड डॉन’सोबत तर छायाचित्र काढले नाही ना, असे सांगत लगेच अदानींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही असेही ते म्हणाले.कोणी ट्विटरवरुन आमच्यावर निशाणा साधला म्हणजे आमच्या अंगाला भोके पडत नाहीत. प्रत्येकाच्या ट्वीटला उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही. असे तर रोज हवसे-नवसे-गवसे ट्वीट करत राहणार त्यांना उत्तर देण्यास आम्ही बांधील नाही, अशा शब्दांत त्यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले.