राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर नेते सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. जोपर्यंत आपण राष्ट्रवादीमध्ये कार्यरत असू तोपर्यंत बंडखोरी केलेल्या गद्दारांना पुन्हा पक्षात घेणार नाही, अशा निर्वाणीच्या भाषेत त्यांनी धस यांचे नाव न घेता त्यांना फटकारले. एखाद्याला संधी दिल्यानंतर त्याचं सोनं करायचं की त्याची राख करायची हे ज्याच्या त्याच्या हाती असते. पण ज्यांनी स्वत:च्या पहिलीला सोडले नाही, ते इतरांना काय सोडणार असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, सुरेश धस यांनीही पवारांच्या या टीकेला उत्तर दिले असून येत्या दोन दिवसांत पवारांना त्यांच्याच शब्दांत उत्तर देऊ असा इशाराही दिला.

बीड जिल्हा परिषद निवडणुकीनंतर धस यांच्या ५ सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यापासून राष्ट्रवादीचे नेते आणि सुरेश धस यांच्यात कुरबुरी सुरू झाल्या होत्या. दरम्यान एका कार्यक्रमानिमित्त इथे आल्यानंतर पवारांनी धस यांचे नाव न घेता त्यांच्या बंडखोरीवर भाष्य केले. पवारांची टीका जिव्हारी लागलेल्या धस यांनीही प्रत्युत्तर देत, येत्या एक दोन दिवसांत पवारांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ, असा इशाराच दिला. पवारांचं आपलं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं पाहायचं वाकून असा स्वभाव असल्याचे ते म्हणाले.