आज विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्याबद्दल विधानसभेत त्यांच्या आभाराच्या प्रस्तावाची भाषणं झाली. आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण झालं. आपल्या भाषणात अजित पवार यांनी विजय वडेट्टीवाराचं कौतुक करताना मला टोमणे मारायची सवय नाही असं हात जोडून सांगितलं. त्यांनी हा टोला उद्धव ठाकरेंना लगावला का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

काय म्हणाले अजित पवार ?

उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस विदर्भाचं प्रतिनिधीत्व करत आहेत, वनमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार प्रतिनिधीत्व करत आहेत आणि आता विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते म्हणून प्रतिनिधीत्व करत आहेत. तुम्ही शिवसेनेत होतात, विदर्भात शिवसेना नव्हती पण चिमूर, ब्रह्मपुरीसारख्या ठिकाणी शिवसेना वाढवण्याचं काम तुम्ही केलंत. हे सगळं काम बघूनच १९९८ मध्ये विधानपरिषदेचं सदस्यपद आणि आमदारपद मिळालं. २५ वर्षांची कारकीर्द तुमची झाली आहे.

विजय वडेट्टीवार यांचं कौतुक

विजय वडेट्टीवार, तुम्ही जी जी राजकीय भूमिका घेतली मग ती शिवसेनेत असताना घेतली किंवा काँग्रेसमध्ये असताना घेतली ती योग्य होती. आमच्याकडे मतदारसंघात उभं बदलताना अडचण आहे. तुम्ही दोन-दोन ठिकाणी निवडून आलात. तुमचं काम, तुमचा जनसंपर्क मोठा आहे. महाविकास आघाडीचं सरकार आणलं गेलं तेव्हा तुम्हाला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांना जशी खाती मिळाली तसं खातं मिळेल. ते मिळालं नाही, त्यावेळेस माझी आणि तुमची काय चर्चा झाली? हे तुम्हाला आणि मला माहित आहे. मी ते कुणालाच सांगणार नाही मी शब्दाचा पक्का आहे तुम्हाला माहित आहे. पण कुठेतरी माणसाला वाईट वाटतं, वेदना होतात.

अजित पवारांनी हात जोडत सांगितलं माझा टोमणे मारायचा स्वभाव नाही

विरोधी पक्षनेते पद द्यायचं म्हटलं तर तुमचं नाव दुसऱ्यांदा आलं. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे पद घेतील असं वाटलं होतं. पण जे लढायचं ते तुम्ही लढा नंतर पुन्हा दिवस चांगले आले आम्ही आहेच. अशा पद्धतीचा काहींचा स्वभाव असतो. मी कुणाचं नाव घेत नाही. गंमतीचा भाग सोडून द्या, माझा टोमणे मारायचा स्वभाव नाही हे मी कृपा करुन आपल्याला सगळ्यांना सांगतो असं अजित पवार म्हणाले आणि त्यांनी हातही जोडले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टोमणे म्हटलं की हल्ली समोर येतं ते उद्धव ठाकरेंचं नाव. कारण भाजपा कायमच त्यांच्यावर टोमणे मारण्यावरुन टीका करत असते. अशात अजित पवारांनी आता असा उल्लेख केल्यामुळे विजय वडेट्टीवारांचं कौतुक करत असताना सभागृहात अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यांनी हा टोला उद्धव ठाकरेंनाच लगावला असं नसेलही पण अजित पवारांनी माझा टोमणे मारायचा स्वभाव नाही हे म्हटल्यावर सभागृहातले सत्ताधारी पक्षातले आणि विरोधी पक्षातले आमदार खळखळून हसले. त्यावरुन अशी चर्चा आता होते आहे.