बारामतीत आयोजित एका आरोग्य शिबिराचे उद्घाटन आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी अनेकांना आरोग्यासंदर्भात मोलाचे सल्ले दिले. तसेच त्यांनी त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हाची आठवणही सांगितली. यावेळी अजित पवारांनी दिलेल्या खुमासदार भाषणाने उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – एकनाथ शिंदेंनी दिले मुंबई मनपासाठी नव्या युतीचे संकेत; म्हणाले, “डबल इंजिनला ट्रिपल इंजिनमध्ये…”

काय म्हणाले अजित पवार?

”आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या, असं डॉक्टर आपल्याला सातत्याने सांगत असतात. मात्र, आपणही आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपण व्यसनाधीन होता कामा नये. नाही तर ‘पी दारू, खा गुटखा आणि ओढ सिगारेट’ एवढंच काही लोकांचं सुरू असतं. मग म्हणतात, मी कसा आजारी पडलो? व्यसनाधीन होऊन काही लोकं देवाने दिलेल्या शरीराला अपाय करतात. त्यामुळे या गोष्टींचा आनंद होत असला, तरी व्यसनापासून दूर राहा”, असा सल्ला अजित पवार यांनी दिला. ”मित्र तुमच्याकडे येतील आणि म्हणतील, ‘चल मी आनंदी आहे, आज बसू’ पण तुम्ही त्याला सांगा नको त्या गोष्टींच्या मागे लागू नको, याचा तुझ्या मुला-मुलींवर परिणाम होतो”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – VIDEO: “काही लोकांनी बेईमानी केली, त्यामुळे…”, फडणवीसांचं मोदींसमोर शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य, म्हणाले…

यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या डोळावर शस्त्रक्रिया झाली तेव्हाची आठवणही सांगितली. ते म्हणाले, ”काही दिवसांपूर्वी मी विदेशात होतो. तिथे माझ्या डोळ्यात खुपायला लागलं. मात्र, तेव्हा मी दुर्लक्ष केलं. एकदिवस मंत्रालयात बसलो असताना पुन्हा अचानक डोळ्यात खूपू लागले. मी सरळ गाडी काढली आणि डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी सांगितलं, रेटीनाचा प्रॉब्लेम आहे. ऑपरेशन करावे लागले. त्यांनी मला कधी करायचं विचारलं? मी लगेच करा म्हणालो. डॉक्टर म्हणाले घरी वगैरे काही सांगणार नाही का? मी म्हणालो, आता झाल्यावरच घरी सांगतो की मी ऑपरेशन करून आलो. मी डॉक्टरांना विचारलं हे मलाच का झाले? डॉक्टर म्हणाले, १० लाखांतून एखाद्याला होतो. त्यात तुम्ही आहात. म्हणजे १० लाखांत मी एकटाच सापडलो”, असा मिश्कील विधानही त्यांनी केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar gave advice on smokers in health camp organized in baramati spb
First published on: 19-01-2023 at 20:41 IST