Babajani Durrani Joins NCP Sharad Pawar: लोकसभा निवडणुकांचे निकाल महाराष्ट्रात महायुतीच्या मनासारखे न लागल्यामुळे विधानसभा निवडणुकांसाठी युतीमधील तिन्ही पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. मात्र, अशातच अजित पवार गटाला धक्का बसला आहे. पक्षाचे माजी विधानपरिषद आमदार व परभणीतील नेते बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवार गटाची साथ सोडून शरद पवार गटात घरवापसी केली आहे. याचवेळी इतरही अनेकजण या मानसिकतेत असल्याचे सूतोवाच दुर्राणी यांनी यावेळी केले. त्यामुळे अजित पवार गटाच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे.

सूचक शायरीनं केली भाषणाला सुरूवात

छत्रपती संभाजीनगर येथे एका जाहीर कार्यक्रमात शरद पवारांच्या उपस्थितीत बाबाजानी दुर्राणी यांचा पक्षाच पुन्हा प्रवेश करण्यात आला. यावेळी दुर्राणी यांनी सूचक शब्दांत अजित पवार गटातील परिस्थितीबाबत दावे केले. यावेळी शायरीनं भाषणाची सुरुवात करताना दुर्राणी यांनी नाईलाजास्तव अजित पवार गटात गेल्याचं विधान केलं आहे.

काय म्हणाले बाबाजानी दुर्राणी?

“कुछ तो मजबुरीयाँ रही होंगी, वरना कोई यूँ बेवफा नहीं होता”, असं म्हणत दुर्राणी यांनी शायरीने भाषणाला सुरुवात केली. “माझी अशी काही मजबुरी नव्हती. १९८० पासून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली मी काम करत आलो आहे. चरख्यापासून घड्याळाच्या चिन्हापर्यंत मी त्यांच्याबरोबरच राहिलो. मराठवाड्यात तेव्हा फक्त तीन नगरपालिका होत्या. पाथरी, परतूर आणि उस्मानाबाद अशा तीन नगरपालिकांमध्ये आपले नगरसेवक निवडून आले होते. तेव्हापासून मी शरद पवारांसोबत आहे”, असं दुर्राणी म्हणाले.

Sharad Pawar on Raj Thackeray: “दुर्दैवाने जनतेनं राज ठाकरेंसारखी भूमिका…”, शरद पवारांचा टोला; अजित पवारांनाही केलं लक्ष्य!

“काही कारणास्तव तिकडे गेलो”

“परभणीत राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. पक्ष फुटल्याबरोबर मी शरद पवारांसोबतच राहिलो. पण दोन महिन्यांनंतर काही कारणास्तव काही लोकांच्या सांगण्यावरून तिकडे गेलो. मी एवढंच सांगेन की शरद पवारांना सोडून गेलेले अनेक लोक मी माझ्या आयुष्यात पाहिले. ते पुन्हा विधानभवन परिसरात दिसले नाहीत. ते शून्य झाले. बरं झालं मी शून्य होण्याआधीच आलो”, असं म्हणून दुर्राणी यांनी आणखी एक शेर म्हणून दाखवला.

भँवर जब उभरेगा
उभारा दे के मारे गा
सुनो ऐ मछलियों
तुम्हे वो चारा दे के मारेगा
सुना है अच्छे दिन भी आने वाले है
बडा चालाख दुश्मन है
सहारा दे के मारेगा!

असा सूचक शेर बाबाजानी दुर्राणी यांनी यावेळी म्हणताच उपस्थितांनी त्याला टाळ्यांनी दाद दिली.

“भाजपासोबत गेलेल्यांना लोकांनी शून्य केलं”

“लोकसभा निवडणुकीचं चित्र मी पाहिलं. लोकांची मानसिकता ही आहे की जे जे पक्ष भाजपाबरोबर गेले, लोकांनी त्यांना शून्य केलं. १० वर्षांत देशात जातीवाद, धर्मवाद पसरवला. एका पंतप्रधानाला शोभणार नाही अशी भाषणं मोदींची झाली. आज मुस्लीम समाजाला मदत करणारा, त्याच्या पाठीवर हात फिरवणारा एक व्यक्ती हवाय. त्या समाजाला काही दिलं नाही तरी चालेल, पण त्यांच्याकडे चांगल्या भावनेनं पाहणारं नेतृत्व हवं. ते शरद पवारांचं आहे”, असं दुर्राणी म्हणाले. “देशात परिवर्तन होत नाही तोपर्यंत शरद पवार हयात राहतील”, असंही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी सगळा त्रागा इथे मोकळा करणार होतो. पण मला सांगितलं थोडक्यात भाषण करा. मला जे काही मिळालं, ते शरद पवारांमुळे मिळालं. मला आता खंत वाटते की मी शरद पवारांना सोडून गेलोच कसा? मला अनेक कार्यकर्ते, माझे सहकारी म्हणत होते की तुम्ही असा निर्णय कसा घेतला?” असंही दुर्राणी यांनी नमूद केलं.