बारामती विधानसभा मतदारसंघातून फक्त अजित पवार हेच निवडून येऊ शकतात. दुसरे कोणीही नाही. अजित पवार यांच्या विरोधात मी निवडणूक लढविणार नाही किंबहुना कुटुंबातील कोणीही निवडणूक लढविणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार उभे राहणार नाहीत. अजित पवार तसा निर्णय घेणार नाहीत. बारामती लोकसभा मतदारसंघात कोणीही सुप्रिया सुळे यांच्याविरोधात प्रचार केला तरी, सुळे या निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार गटाकडून एकमेकांविरोधात आरोप केले जात आहेत. दिलीप वळसे पाटील यांनीही रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर पुण्यात आले असताना रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षाने शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आहे. घरे फोडून भाजप नेते आनंद घेत आहेत. मात्र, भाजपचे फोडाफोडीचे राजकारण राज्यातील जनतेलाही पटलेले नाही. शरद पवार यांच्याबरोबर चाळीस वर्षे राहूनही मंत्री दिलीप वळसे पाटील यांना शरद पवार कळले नाहीत.

त्यांच्या वयाचा मान ठेवत काही गोष्टी बोलणार नाही. दिलीप वळसे पाटील चाळीस वर्षे शरद पवार यांच्याबरोबर होते. मात्र त्यांची भूमिका वळसे पाटील यांना कधीच कळली नाही. भारतीय जनता पक्षाने पक्षात भांडणे लावली आहेत. यापूर्वी शिवसेनेमध्ये त्यांनी फूट पाडली. आता राष्ट्रवादी काँग्रेस फोडून ते गंमत बघत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तात्पुरत्या सत्तेसाठी भाजपशी हातमिळवणी केली आहे. जे भाजपवर टीका आणि आरोप करत होते. ते आता यासंदर्भात कोणती भूमिका घेणार, अशी विचारणा रोहित पवार यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.