हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आज आरोप-प्रत्यारोपांचं जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. विशेषत: विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या भाषणात विरोधकांसोबतच थेट ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य केल्यामुळे विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर उत्तर देताना “मागे काय घडलं ते सगळं सोडून द्या”, असा सल्ला दिला. यावेळी अजित पवारांच्या भाषणादरम्यान शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले मध्येच बोलल्यामुळे अजित पवारांनी त्यांना खोचक टोला लगावला.

नेमकं काय घडलं?

अजित पवारांनी मुख्यंत्र्यांच्या भाषणावर उत्तर देताना मागचं सगळं बाजूला सारण्याचा सल्ला दिला. “मागच्या काळात झालं ते गंगेला मिळालं. आता ते कशाला उकळत बसायचं. उकिरडा कितीही उकरला तरी त्यातून काही निघत नाही. नव्या वर्षात राज्याचे प्रमुख म्हणून तुम्ही निर्णय घ्या की ‘हे कुणी काही बोलत असतील तर माझे प्रवक्ते वगैरे त्यावर बोलतील’, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

“मुख्यमंत्री महोदय, तुमच्या मुलाच्या वयाच्या लोकांना…”, अजित पवारांचं एकनाथ शिंदेंच्या टीकेला प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यात मन रमवू नका!”

दीपक केसरकरांवरून मिश्किल टिप्पणी

“दीपक केसरकर आहेत ना एकदम वस्ताद बोलायला. ते एकदम कुठेही आठ्या पडू देत नाहीत. हसत नाहीत. रडत नाहीत. शांतपणे उत्तरं देत असतो. प्रश्न विचारणाऱ्यालाच कळत नाही की याच्या मनात नक्की काय चाललंय. आणि जिथे कुठे खोच मारायचीये, तिथे बरोबर मारतो. अशी चांगली आम्ही तयार केलेली माणसं तुम्ही तयार घेतलेली आहेत. तुम्ही त्यांच्यावर जबाबदारी द्या”, असा सल्ला अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना दिला.

यावर बोलताना एकनाथ शिंदेंनी बसल्या बसल्याच “१०० दिवस ते बोलतात, एक दिवस तरी मी नको बोलू?” असा प्रश्न विचारताच अजित पवार म्हणाले, “नको, त्यातून तुमचा मोठेपणा दिसेल. आपण आपलं चालत राहायचं. बोलणारे बोलत असतात. आपण आपलं काम करत राहायचं. जनता व्यवस्थित बघत असते”, असं अजित पवार म्हणाले.

“अजितदादा, शेतकऱ्यांनी पाणी मागितलं तेव्हा तुमच्या तोंडून…”, मुख्यमंत्र्यांनी करून दिली ‘त्या’ विधानाची आठवण! म्हणाले, “आत्मक्लेश…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोगावलेंचा ‘डिस्टर्बन्स’!

दरम्यान, अजित पवार बोलत असताना समोरच्या बाकांवरून भरत गोगावले मध्येच काहीतरी बोलले. त्यावरून अजित पवारांनी त्यांना खोचक शब्दांत टोला लगावला. “गोगावले तुम्हाला कितीदा सांगितलं की तुम्ही मला बोलताना अडथळा आणू नका म्हणून. तुम्ही जेवढं मला डिस्टर्ब कराल, तेवढं तुमचं मंत्रीपद दूर जाईल. तुम्हाला माहीत नाही माझे आणि एकनाथ शिंदेंचे काय संबंध आहेत. काय तुम्हाला कळत नाही. कठीण आहे राव. तुम्ही आमदार आहात. जरा समजून घ्या”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.