नागपूरमध्ये आज महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीसांच्या होम पीचवर महाविकास आघाडीची नेतेमंडळी कशाप्रकारे राजकीय फटकेबाजी करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या पार्श्वभूमीवर सभेसाठी नागपुरात दाखल झालेले अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना राजकीय मुद्द्यांवर भूमिका मांडली. यावेळी त्यांच्याविषयी सत्ताधारी गोटातून केल्या जाणाऱ्या विधानांचाही त्यांनी मिश्किलपणे समाचार घेतला.

नागपूर फडणवीसांचं होम पीच, मग…

दरम्यान मविआची आजची सभा नागपुरात होणार असून ते फडणवीसांचं होम पीच असल्यामुळे तिथे राजकीय फटकेबाजीची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “प्रत्येक जिल्ह्यात कुणाचं ना कुणाचं होम पीच असणारच आहे. आम्ही राज्याच्या वतीने तिथे सभा घ्यायला जातोय. जसं त्यांचं होम पीच आहे, तसं अनिल देशमुख, सुनील केदारांचं होम पीच आहे. नितीन राऊतांचं होम पीच आहे”, असं अजित पवार म्हणाले.

गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ विधानावर टोला!

दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवारांनी गुलाबराव पाटलांच्या विधानाचा समाचार घेतला. “बरेच आमदार त्यांच्यासोबत आहेत. पण बघुयात. कारण कोणतंही लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज असते. आणि ती तिथी येतेय. पण असं असलं तरी अजून कुळ बघावं लागेल, गुण जुळावे लागतील. मग ते काम करावं लागेल. सध्या अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेस आहेत. ते म्हणतील तो आकडा बनेल”, असं गुलाबराव पाटील म्हणाले. त्यावर अजित पवारांनी खोचक प्रतिक्रिया दिली.

“कोणतंही लग्न व्हायचं असेल तर…”, अजित पवार सरकारमध्ये जाण्यासंदर्भात गुलाबराव पाटलांचं सूचक विधान!

“मला एक कळत नाही की माझ्यावर सगळ्यांचं प्रेम एवढं का ऊतू चाललंय? मी दोन दिवस बघतोय, गुलाबराव पाटील बोलले, उदय सामंत बोलले, दादाजी भुसे बोलले. अनेकांची वक्तव्य मी ऐकली. या सगळ्यांचं एवढं प्रेम का उतू चाललंय ते कळायला मार्ग नाही. मी माझी भूमिका तुमच्यासमोर ठेवली आहे. इथेही अजित पवार येणार की नाही? आले तर भाषण करणार की नाही करणार? बसणार तर कुठे बसणार? अशी चर्चा लोकांनी सुरू केली होती”, असं अजित पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार-अमित शाह भेट?

दरम्यान, अजित पवार आणि अमित शाह यांची गुप्त भेट झाल्याच्या चर्चेवरही अजित पवारांनी पडदा टाकला. “कुठं झाली? केव्हा झाली? मुंबईत अमित शाह उतरल्यापासून सगळे चॅनल त्यांच्या पाठिशी होते. तिथून ते विनोद तावडेंच्या घरी गेले. तिथून ते सह्याद्रीला गेले. मी कालच नागपुरात येणार होतो. पण सभा संध्याकाळी असल्यामुळे माझं अनिल देशमुखांशी बोलणं झालं.इथे एक कार्यक्रम आहे, तो करून दुपारी अनिल देशमुखांकडे आमचं जेवण आहे. त्यामुळे या सगळ्या बातम्या बिनबुडाच्या आहेत. अशा गोष्टी लपून राहात नसतात. त्यामुळे कारण नसताना गैरसमज निर्माण करण्याचं काम कुणीही करू नये”, असं अजित पवार म्हणाले.