Ajit Pawar on Madhuri Elephant Kolhapur : कोल्हापूरच्या नांदणी येथील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी (माधुरी) या हत्तीणीला परत आणावं यासाठी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं, मूक मोर्चे, स्वाक्षरी मोहिमा राबवण्यात आल्या. दरम्यान, कोल्हापूरकर त्यांची मागणी सरकारदरबारी मांडत आहेत, महायुतीमधील नेत्यांकडे मागणी करत आहेत. अशातच एका तरुणाने उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे भावना व्यक्त केल्या.

अजित पवार एका कार्यक्रमात भाषण करत असताना उपस्थितांपैकी एक तरुण अजित पवारांना म्हणाला, “दादा, आमची माधुरी हत्तीण परत आणा, तिला वनताऱ्याला (गुजरात) नेलंय.” तरुणाचा आवाज अजित पवारांपर्यंत पोहोचला नाही. त्यावर तो तरुण पुन्हा म्हणाला, “आमची कोल्हापूरची हत्तीण आहे, तिला वनताऱ्याला नेलंय. लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.” यावर अजित पवार म्हणाले, “तू माधुरी हत्तीणीबद्दल बोलतोयस ना? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तिला वनताऱ्याला पाठवण्यात आलं आहे.”

अजित पवारांचा तरुणाला चिमटा

अजित पवार म्हणाले, “प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी कायदा आहे. आपण संविधानाने चालतो, आपण आपला देश कायद्याने चालवतो, तुलाही आठवत असेल प्राणी-पक्ष्यांसाठी कायदा सुरू केला आहे. शेवटी तुला आणि मला जसा जगण्याचा अधिकार आहे, तसाच तो प्राणी व पक्ष्यांनाही आहे. त्यामुळेच त्या हत्तीणीला नेलं आहे. म्हणूनच ती हत्तीण गेली बाबा… त्या हत्तीणीचं लय लागलंय बाबा… तुला एकदा कुठंतरी हत्तीणीवर नेऊन बसवतोच. परंतु, तू चांगल्या भावनेने बोललास. तू प्राणीप्रेमी असशील म्हणून तू भूमिका मांडलीस, त्याबद्दल तुझं अभिनंदन.”

मार्ग काढायचा प्रयत्न करणार : अजित पवार

उपमुख्यमंत्री म्हणाले, “मी माधुरी हत्तीणीच्या प्रकरणात खूप खोलात गेलो. जशी आपल्याकडे आपण बैलगाडा शर्यत सुरू केली आहे तसा काही मार्ग काढता येतोय का ते आम्ही पाहत आहोत. संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून आम्ही प्रयत्न करू.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोल्हापूरकरांचा जिओवर बहिष्कार

अंबानी समूहाच्या गुजरातमधील वनतारा प्रकल्पामध्ये हत्ती नेल्यानंतर या समूहाच्या विविध उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे. माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी अंबानी समूहाच्या जिओचे मोबाइल नंबर बदलून बहिष्कार मोहीम राबवली जात आहे. आमदार राहुल आवाडे यांनीही आपल्याकडील जिओचा एक नंबर दुसऱ्या कंपनीत बदलत असल्याचे सांगितले. आतापर्यंत हजारो कोल्हापूरकरांनी व बेळगावी जिल्ह्यातील अनेक गावांमधील लोकांनी जिओचा नंबर इतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये पोर्ट केला आहे.