Ajit Pawar On Ladki Bahin Yojana : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. यातच सध्या अनेक नेत्यांचे राज्यभरात सभा आणि मेळावे सुरु आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीचे नेते सरकारने राबववलेल्या योजनांची माहिती सांगत आहे. काही दिवसांपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना महिन्याला १५०० रुपये देण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील कोट्यवधी महिला पात्र ठरल्या आहेत. या योजनेचा लाभ मिळालेल्या महिलांना जुलै पासून महिन्याला १५०० रुपये देण्यास सुरुवात झाली.

राज्य सरकारने सर्वात आधी दोन महिन्यांचे एकत्र म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे मिळून महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा केले होते. त्यानंतर पुन्हा सप्टेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहि‍णींना अजून एक मोठी खुशखबर दिली आहे. लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन महिन्यांचे पैसे खात्यावर जमा होणार असून नोव्हेंबर महिन्यांचे पैसे देखील ऑक्टोबरमध्येच म्हणजे दिवाळीलाच जमा होणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

हेही वाचा : Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेबाबत सरकारच्या महत्त्वाच्या सूचना; आता ‘त्या’ बँकांवर कारवाई होणार

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आधी दोन महिन्यांचे तीन हजार दिले. त्यानंतर आता लाडक्या बहि‍णींना सप्टेंबर महिन्याचे पैसे दिले आहेत. मात्र, आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे लाडकी बहीण योजनेचे पैसे १० ऑक्टोबरच्या आधी दिवाळी भाऊबीजेची ओवाळणी बहि‍णींच्या खात्यावर जमा होणार आहे, हा शब्द मी तुम्हाला देतो”, असं अजित पवार यांनी एका सभेत बोलताना म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किती तारखेला मिळणार पैसे?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एका सभेला संबोधित करताना सांगितलं की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे लाडकी बहीण योजनेचे पैसे १० ऑक्टोबरच्या आधी म्हणजे भाऊबीजेलाच बहि‍णींच्या खात्यावर जमा होणार आहेत, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.