नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान होते, शेतकरी देशोधडीला लागतात. अशा अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी देशातील अनेक राज्यांत पीकविमा योजना सुरू आहेत. महाराष्ट्रातही एक रुपयात पीकविमा योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेवरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. ते दिशा कृषी उत्पन्न कार्यक्रमात बोलत होते.

पीकविमा योजनेत अनेकांनी चुना लावला

अजित पवार म्हणाले, “आम्ही मागे एक रुपयांत पीकविमा देण्यास सुरुवात केली होती. ती योजना अडचणीत आली. ग्रामीण भाषेत बोलायचं झालं तर खूप लोकांनी आम्हाला चुना लावला. चुनाच लावला. त्यानंतर सगळं काढलंय. आम्ही आता तुमच्या भल्याचं असेल, ते करणार आहोत. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी नव्याने ही योजना आणली जाईल. याकरता जुन्या योजनेत काही बदल करण्यात येतील. हे बदल करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जाईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल”, असे पवार यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी माझं जीवन संपवतोय, मुलाबाळांना सोडून आत्महत्या करतोय, ही भावना शेतकऱ्यांच्या मनात येता कामा नये, यापद्धतीने पुढे जायचं आहे. त्याचं नियोजन केलं आहे. त्याकरता कामाला लागलो आहे. तुम्ही नाऊमेद होऊ नका. मी आज अर्थमंत्री म्हणून सात लाख वीस कोटींचा अर्थसंकल्प सादर केलाय. चांद्यापासून बांद्यापर्यंत माझ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, त्याच्या पाठीशी उभे राहू. तुम्ही तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका”, असंही आवाहन अजित पवारांनी आज शेतकऱ्यांना केलं.