भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित यांच्यावर टीका केली होती. याला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही. फुटकळ लोकांवर काय बोलणार,” अशी टीका अजित पवारांनी पडळकरांवर केली आहे.

गोपीचंद पडळकर काय म्हणाले होते?

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीवरून गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार आणि रोहित पवारांना लक्ष्य केलं होतं. “गेल्यावर्षी सरकार होतं म्हणून आजोबा आणि नातू चौंडीत गेले होते. मग आता कार्यक्रम घेण्याची हिंमत का झाली नाही? रोहित पवारांनी चौंडीत कार्यक्रम घेण्याची गरज नाही. यापूर्वी त्यांनी चौंडीत कार्यक्रम घेतला नव्हता,” असं गोपीचंद पडळकरांनी सांगितलं.

हेही वाचा : “हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

“सरकार असताना शरद पवार एकदाही चौंडीला…”

“गेल्यावर्षी नातवाला लॉन्च करण्यासाठी कार्यक्रम घेतला होता. त्यांना वाटलं लोक येडे राहिले आहेत. पण, लोक हुशार झाले आहेत. सरकार असताना शरद पवार एकदाही चौंडीला जयंतीला गेले नव्हते,” अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“अलीकडं शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय…”

प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेतला. “राज्यात पवार कुटुंब कधीपासून काम आहे. १९६७ साली शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले. ४ वेळा मुख्यमंत्री, १० वर्षे कृषीमंत्री, संरक्षण मंत्री, केंद्रात आणि राज्यात विरोधी पक्षनेते होते. अलीकडं शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही. त्यामुळे नाव घेण्यात येतं,” असा टोला अजित पवारांनी पडळकरांना लगावला.

हेही वाचा : पुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही उत्तर देण्यास बांधील आहोत का?”

“कोण, काय नाव घेतं? त्यांची राजकारणातील उंची आणि विश्वासार्हता पाहावी. कुणीही फुटकळ लोक काहीही बोलायला लागल्यावर आम्ही उत्तर देण्यास बांधील आहोत का?,” अशा शब्दांत अजित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.